लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : पाडलीच्या ग्रामस्थांना सातपुडय़ातील सर्वात मोठी असलेल्या उदय नदीच्या पाण्यातून ये-जा करीत आपले दैनंदिन काम करावे लागत आहे. सद्या पावसाळ्यामुळे नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने चार ते पाच फूट पाण्यातून जीव धोक्यात टाकून ग्रामस्थ नदी ओलांडत आहेत. त्यामुळे याठिकाणी पूल बांधण्याची मागणी जोर धरून आहे. या परिसरातील नागरिकांना धडगाव येथे ये-जा करण्यासाठी उदय नदीचा वापर करावा लागत असल्याने याठिकाणी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून पूल बांधण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.स्वातंत्र्यानंतरही पाडलीचा एकतोडपाडा येथील नागरिकांना धडगावला येथे -ये-जा करण्यासाठी किंवा इतर गावांशी संपर्क साधण्यासाठी उदय नदीवर पूल नसल्याने नदीपात्रातूनच जीवमुठीत घालून प्रवास करावा लागत आहे. दरम्यान येथील बालकांनाही शाळेत नदीपार करून जावे लागते. या पाडलीच्या एक तोडपाडय़ात जिल्हा परिषद शाळा असून, पावसाळ्यात नदीला पूर अथवा पाणी आल्यास शिक्षकांना याठिकाणी येता येत नसल्याने विद्याथ्र्याचे मोठय़ा प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असून, या नदीतून मार्गक्रमण करतांना अनेकदा रूग्णांना प्राणही गमवावा लागतो. ही सर्व परिस्थिती पाहता प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता गांभीर्याने लक्ष देवून उदय नदीवर त्वरित पूल बांधणे आवश्यक आहे. या पुलामुळे परिसरातील पाडे जोडले जाणार असून, अस्तंबा गावासही त्याचा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.
जीव धोक्यात टाकून ग्रामस्थांचा नदीतून प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 11:54 IST