लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील भागापूर येथील गोमाई नदीवर पूल बांधलेला नसल्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पावसाळ्यात या नदीत जास्त पाणी राहत असल्याने नागरिकांचे ये-जा करण्यासाठी हाल होतात. काहीवेळा जास्त पाण्यातून नदीतून मार्ग काढावा लागतो. त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन आता तरी येथे पूल बांधावा, अशी मागणी परिसरातील गावांमधील नागरिकांकडून होत आहे.शहादा तालुक्यातील कवळीथ, गोगापूरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरून गोमाई नदी वाहते. या नदीवर भागापूर येथे पूल नसल्याने पावसाळ्याच्या दिवसात ग्रामस्थांना अनेक समस्या उद्भवतात. पावसाळ्यात या नदीला मोठ्या प्रमाणात पूर असतो. त्यामुळे ग्रामस्थांचा ये-जा करण्याचा एकमेव मुख्य रस्ता असल्यामुळे गावाचा इतर गावांशी संपर्क तुटतो. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पावसाळ्यामध्ये जर शाळा सुरू राहिल्या तर विद्यार्थ्यांनाही शिक्षणापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे त्यांना ब्राह्मणपुरीपर्यंत पायी यावे लागते. तसेच पूरपरिस्थितीत अचानक प्रकृती बिघडल्यास एखादा रुग्ण दगावण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या नदीवर मोठा पूल बांधण्यासंदर्भात स्थानिक ग्रामपंचायतीने संबंधित अधिकाºयाकडे मागणी केली होती. ही मागणी मंजूरदेखील करण्यात आली. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी नदीवर पूल बांधण्याचा प्रस्ताव तयार करून पाच कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती संबंधित विभागाने दिली. परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे या कामाचे टेंडर निघाले नसल्याचे बोलले जात आहे.गोमाई नदीला पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पूर असतो. ये-जा करण्यासाठी हा मुख्य रस्ता असल्याने पावसाळ्यात अनेक अडचणी निर्माण होतात. पूल बांधण्यासंदर्भात ग्रामपंचायतीने याआधी संबंधितांना निवेदने दिली आहेत. परंतु अद्यापही पुलाचे काम सुरू झालेले नाही. संबंधित विभागाने लवकरात लवकर पुलाचे काम सुरू करुन ग्रामस्थांचे होणारे हाल थांबवावेत.-नीलेश पाटील,उपसरपंच, भागापूर, ता.शहादा.
पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 12:54 IST