बिलबारपाडा-मडगाव हा रस्ता गेल्या पाच वर्षापूर्वी पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत तयार करण्यात आला आहे. या रस्त्यावरील बिलबारपाडाजवळील पुलाचा स्लॅब तुटल्याने गेल्या सहा महिन्यांपासून या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे या परिसरातील जनसंपर्क तुटला आहे. या रस्त्यावरील आदिवासी विकासमंत्री ॲड.के.सी. पाडवी हे त्यांच्या असली या गावाकडे येत असताना त्यांची गाडीही स्लॅब तुटलेल्या ठिकाणी अडकली होती. त्यावेळी पोलीस पाटील व ग्रामस्थांनी त्यांची गाडी तेथून काढली होती. असाच अनुभव आपल्यालाही गेल्या दोन दिवसांपूर्वी आला होता. गाडी अडकल्याने ग्रामस्थांनी ती काढली होती. हा रस्ता वर्दळीचा आहे. मात्र स्लॅब तुटल्याने वाहतुकीची कोंडी झाली आहे. रात्री-अपरात्री एखादे वाहन चुकून या रस्त्याने गेल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करून तो वाहतुकीला खुला करावा, अशी मागणी जान्या पाडवी यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी व संबंधित विभागाकडे निवेदन दिले आहे.
२१ ऑगस्टला आपण या रस्त्यावरून आपल्या जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये जनसंपर्कासाठी जात असताना आपलीही गाडी याठिकाणी अडकली होती. त्यावेळी बिलबारपाडा येथील पोलीस पाटील व ग्रामस्थांनी आपल्याला मदत करुन गाडी काढली. हा अत्यंत धोकेदायक रस्ता झाल्याने येथे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.
-जान्या पाडवी, जि.प. सदस्य