सविस्तर वृत्त असे की, शहादा तालुक्यात गेल्यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे सर्वच नदीनाल्यांना मोठ्या प्रमाणावर पूर आले होते. शहादा तालुक्यातील धारेश्वरहून गोगापूरकडे जाणाऱ्या मार्गालगत शेतशिवारातून वाहून येणारा नाला आहे. हा नाला धारेश्वरजवळील सुखनाई नदीला मिळतो. या नाल्यावरून दरवर्षी पावसाळा संपल्यावर शेतकरी भराव करून ये-जा करीत असतात. या मार्गावरून शनिवारी सायंकाळी धारेश्वरकडून जवखेडा रस्त्यावरील नाल्यावर मातीचा भराव केलेल्या जागेवर अचानक लाकूड भरून जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा टायर अचानक भराव केलेल्या मातीत घसरले व टॅक्ट्रर नाल्यात कोसळले. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखत ट्रॅक्टरवरून उडी मारून आपले प्राण वाचवले. अपघात एवढा भीषण होता की, ट्रॅक्टरचा अक्षरशः चुराडा झाला होता.
या मार्गावर नेहमी शेतकऱ्यांची शेतमाल घेऊन जाण्यासाठी वर्दळ असते. पावसाळ्यात हा मातीचा भराव वाहून जात असल्याने शेतकऱ्यांना नाल्यातून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. तसेच पाणी जास्त प्रमाणात असल्यावर हा मार्गच बंद पडत असल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून जवखेडा-धारेश्वर मार्गावरील नाल्यावरून ये-जा करण्यासाठी फरशी पूल बांधून होणारा त्रास कमी करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.