कोरोना महामारीचा परिणाम सलग दुसऱ्या वर्षी जाणवत असून शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. मागील महिन्यात कोरोना महामारीचा परिणाम केळी पिकावरही मोठ्या प्रमाणात दिसून आला. रमजान महिन्यात वाढती मागणी असूनदेखील व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे केळीचे उत्पादन खूपच कमी भावाने शेतकऱ्यांना विकावे लागले.
आताही शेतकऱ्यांच्या टरबूज व खरबूज पिकाला भाव मिळत नसून, व्यापारीही फिरकत नाही. व्यापारी आले तर खूपच कमी भावाने टरबूज व खरबुजाची मागणी करत आहेत. म्हणून, नाइलाजास्तव शेतकरी रस्त्यावर आपला माल विकून लावलेला खर्च काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. आर्थिक टंचाईच्या काळात शेतकऱ्यांनी उधार-उसनवारीने पैसे गोळा करून मोठ्या आशेने टरबूज व खरबुजाची लागवड केली. शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने मल्चिंग पेपर, दर्जेदार बियाण्यांची लागवड करून ठिबक सिंचनाद्वारे या पिकांची जोपासना केली. एकरी ५० ते ६० हजार रुपये खर्च आला असून खरेदीसाठी क्वचित व्यापारी येत असल्यामुळे अत्यंत कमी भावात मागणी करत आहेत. किंबहुना, अनेक वेळेस खरेदीसाठी व्यापारी येत नसल्याने माल विक्रीस मोठी अडचण निर्माण झाली आहे. शेतकरी स्वतः मार्केटपर्यंत आपला माल घेऊन गेला, तर तिथेही खूपच कमी भाव मिळत आहे. एखादवेळेस गाडीभाडेच निघत आहे.
जानेवारी महिन्यात लागवडीच्या वेळी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे या पिकाला चांगला नफा मिळेल, अशी अपेक्षा शेतक-यांना होती. मात्र, फळतोडणीच्या वेळेस कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने शासनाला मागील वर्षाप्रमाणे या वर्षीही कठोर निर्बंध लादावे लागले. अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या, मृत्यूचे वाढते प्रमाण यामुळे शासनाला सरसकट लॉकडाऊन लावावे लागले. तालुक्यातील जयनगर, निंभोरे, वडाळी, कोंढावळ येथील शेतकऱ्यांनी लावलेल्या टरबूज व खरबूज पिकांसाठी व्यापारी भेटत नाही. म्हणून, शेतकऱ्यांना या पिकांसाठी लावलेले भांडवल काढण्यासाठी आपला माल रस्त्यावर घेऊन विक्रीस बसावे लागत आहे.
मी तीन एकर क्षेत्रात टरबुजाची लागवड केली होती. एकरी ५० ते ६० हजार रुपये खर्च आला असून व्यापारी कमी भावाने मागणी करत असल्यामुळे भांडवल निघणेही मुश्कील झाले आहे. म्हणून, शेतकऱ्यांना नाइलाजास्तव रस्त्यावर आपला माल विकावा लागत आहे.
शेतकरी - सुभाष आनंदसिंग गिरासे, निंभोरे
टरबूज व खरबुजाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल रस्त्यावर विकावा लागत आहे. फोटो - किशोर माळी, जयनगर