लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : निझरा नदीत मोड, ता.तळोदा येथे तीन ठिकाणी बंधारे बांधून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा उपक्रम लोकसहभागातून राबविण्यात आला. या उपक्रमामुळे मोडसह परिसरातील पाणी पातळीत चांगल्या प्रमाणात वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यासाठी ग्रामस्थांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून चार लाख रुपये खर्च करीत निझरा नदीपात्रात 13 ठिकाणी पोकलॅण्डद्वारे खड्डे खोदल्याने यंदाच्या पावसाळ्यात एक हजार 200 मी.मी. पाऊस झाल्याने धनपूर धरण 16 मीटर्पयत भरून ओसंडून वाहू लागल्याने गेल्या महिन्याभरापासून नदीला दोन तीन वेळा पूर आला. दरम्यान नदी पात्रात खोदण्यात आलेल्या खड्डय़े पूर्ण क्षमतेने भरल्याने परिसरातील जलपातळीत वाढ होण्यास मदत होत आहे. सातपुडय़ातून वाहत येणा:या निझरा नदीवर 2015 मध्ये धनपूर धरण बांधण्यात आले. परंतु गेल्या चार वर्षापासून नदीला पाणी नसल्याने नदी कोरडी ठाक पडली होती. त्यामुळे गेल्या वर्षी ग्रामस्थांनी एकत्र येत नदी पात्रात लोकवर्गणीच्या माध्यमातून नदी नांगरटीसह ठिकठिकाणी पोकलॅण्डद्वारे खड्डे केले. यंदाच्या पावसाळ्यात 47 इंचार्पयत पाऊस झाल्याने नदीतील खड्डे पूर्णपणे भरले असून, या नदीला अद्यापही पाणी सुरूच आहे. त्यामुळे येथील सरपंच जयसिंग माळी, पुरूषोत्तम चव्हाण, दिलीप पाटील, संजय थोरात, रामदास पाडवी, भारत पाडवी, रूबाब भिल, लक्ष्मण पाडवी, न्हानु महाराज आदींनी नदीवर ठिकठिकाणी श्रमदानातून बंधारे बांधून पाणी अडविले आहे. यामुळे भविष्यात निर्माण होणारे जलसंकट टळण्यास मदत होणार आहे.
गेल्या वर्षी दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याने या परिसरातील शेत शिवारातील कुपनलिका व विहिरी पूर्णत: आटल्याने शेतकरी व ग्रामस्थांना पाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागल्याने यंदाच्या पावसाळ्यात नदीवर बंधारे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.