लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील बॅरेज सद्यस्थितीत पाण्याने तुडूंब भरला आहे. मात्र बॅरेजच्या सुरक्षेसाठी असलेले सीसीटीव्ही कमॅरे बंद असून दोन महिन्यांपासून सुरक्षा रक्षकही नसल्याने हा बॅरेज पुन्हा रामभरोसे झाला आहे.सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा येथील बॅरेज पाण्याने १०० टक्के भरला आहे. बॅरेजला धोका पोहोचू नये, परिरसरात चोरी होऊ नये व कायमस्वरुपी निगराणी रहावी यासाठी शासनाने सात ते आठ लाख रुपये खर्च करून येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसिवले आहेत. त्यात दोन जम्बो तर चार लहान कॅमेरे आहेत. सीसीटीव्ही यंत्रणेसाठी कंट्रोल रुम व त्याठिकाणी एलसीडी ठेवण्यात आलेला आहे. मात्र आजच्या स्थितीला सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत. तेथील एलसीडी देखील सुरू झालाच नाही. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या या बॅरेजवर काही दुर्घटना घडली किंवा साहित्याची चोरी झाली तर लाखो रुपये खर्च करून बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा काय उपयोग? असा प्रश्न पडतो. बॅरेजवर भेटी देणाऱ्या अधिकाऱ्यांनी बंद असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबाबत चौकशी करून हे कॅमेरे का बंद राहतात याचा शोध घेणे गरजेचे आहे. सध्या लेटेस्ट टेक्नॉलॉजी आलेली असून सीसीटीव्हीचे फुटेज अर्ध्या रात्री घरीबसल्या संबंधित अधिकारीही पाहू शकतात. एवढी सुविधा असता ती येथे कार्यान्वित का होत नाही. या बॅरेजवर मार्च २०२० पासून सुरक्षा रक्षक नेमले होते. तीन शिफ्टमध्ये चार सुरक्षा रक्षक होते. सहा महिने त्यांनी काम केले. मात्र मिळालेल्या माहितीनुसार त्यांचा १९ मार्च ते ३१ ऑगस्टपर्यंत काम केल्याचा पगारच झालाच नाही. म्हणून विभागीय कार्यालय धुळे यांनी पत्र देऊन त्यांना ३१ ऑगस्टपासून बंद केले आहे. म्हणून सप्टेंबरपासून याठिकाणी सुरक्षा रक्षकही नसल्याने बॅरेजची स्थिती ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी झाली आहे. मार्चपासून या सुरक्षा रक्षकांना पगार नसल्याने त्यांच्यासह कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. निदान जेवढे दिवस काम केले आहे त्या दिवसांचा तरी पगार द्यावा, अशी मागणी या सुरक्षा रक्षकांनी बॅरेजच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.
‘तिसरा डोळा’ पुन्हा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 13:02 IST