लोकमत न्यूज नेटवर्कखेतिया : विधानसभा निवडणुकीच्या काळात राज्याच्या सीमेवर अनेक घटना घडत असतात. या पाश्र्वभुमीवर जिल्हा पोलिस अधिक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा उपविभागीय पोलिस अधिकारी पुंडलिक सपकाळे यांनी मध्यप्रदेश राज्यातील खेतिया तालुका पानसेमल येथील शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली. या बैठकीला शहादा उपविभागीय प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे पानसेमलचे प्रांताधिकारी सुमेरसिंग मजालदा, शहादा तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, पानसेमल तहसीलदार राकेश सरी, पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, धडगाव पोलीस निरीक्षक डी. एम. गवळी, पानसेमल पोलीस निरीक्षक सी.एस. बागेला, खेतिया पोलीस निरीक्षक एम. एम. मालविय, म्हसावदचे साहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज निळे, नायब तहसीलदार जागर रावत व इतर अधिकारी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर गुन्हेगारी प्रवृत्ती वाढू नये, अनुचित प्रकार घडू नये यासंदर्भात चर्चा झाली. फरारी आरोपी, पाहिजे असलेले आरोपी यांचा शोध घेणे, अवैध दारू वाहतूक, शस्त्रांची तस्करी याबाबत विशेष तपासणी नाका उभारण्यात येणार आहे. दोन्ही राज्यातील पोलिसांनी सतर्क राहण्याचेही सपकाळे यांनी सांगितले. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर विशेष पथकाची नियुक्ती करण्यात येणार असून नाकाबंदीतील कर्मचारी यांचे भ्रमणध्वनी नंबर एकमेकांना तसेच सोशल मिडिया ग्रुप तयार करून महत्त्वांच्या घडामोडीची माहिती त्वरित पाठवण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील चारही मतदारसंघ हे मध्यप्रदेश व गुजरात राज्याच्या सिमेवर येतात. त्यामुळे चारही मतदार संघाच्या लागून असलेल्या या दोन्ही राज्यातील जिल्ह्यांमधील अधिका:यांची सुरुवातीला बैठक होईल. त्यानंतर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक स्तरावरील बैठकी होणार आहेत. त्यामुळे निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत होणार आहे.