लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोना संसगार्बाबत माहिती मिळविणे, यंत्रणांमध्ये समन्वय व विश्लेषणासाठी नंदुरबार व शहादा येथे नियंत्रण कक्ष स्थापित करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बोडके आदी उपस्थित होते. डॉ.भारुड म्हणाले, संसर्ग रोखण्यासाठी उपायोजनांमध्ये माहितीचे विश्लेषण महत्वाचे ठरणार आहे. प्रत्येक मूळ बाधिताच्या संपर्कातील व्यक्तिंची माहिती संकलन करण्यावर विशेष लक्ष देण्यात यावे. अशा व्यक्तिंचे स्वॅब त्याच दिवशी घेवून चाचणीसाठी पाठवावे. खाजगी रुग्णालयात येणाऱ्या ताप व खोकल्याची लक्षणे असलेल्यांची माहिती एकत्रित करून त्यांचेही स्वॅब मोबाईल टीमद्वारा घ्यावे. नंदुरबार येथे तीन, शहादा दोन आणि नवापूर व तळोदासाठी प्रत्येकी एक मोबाईल टीम नियुक्त करण्यात यावी व त्यासाठी आवश्यक नियोजन करावे. अधिकाऱ्यांना क्वारंटाईन केंद्राला दररोज भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी करावी. कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह स्वतंत्र खोलीत ठेवण्यात यावा व नातेवाईकांना माहिती देवून कमीत कमी वेळेत अंत्यसंस्कार करण्यात यावेत असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.
नंदुरबार व शहादा येथे नियंत्रण कक्ष होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 12:31 IST