नंदुरबार : धर्मदाय संस्था व जिल्हास्तरीय सामुहिक विवाह समितीतर्फे नंदुरबारात ११ मे रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात सामुहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तब्बल ७० जोडप्यांचे या ठिकाणी शुभमंगल होणार आहे.गरीब शेतकरी व शेतमजूर यांच्या मुलामुलींचे विवाह व्हावेत यासाठी गेल्या वर्षापासून धर्मादाय आयुक्त कार्यालयातर्फे सामुहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन केले जात आहे. यंदा दुसऱ्या वर्षी तब्बल ७० जोडपे विवाहबद्ध होणार आहेत. ११ मे रोजी मार्केट यार्ड परिसरात दुपारी १२.०५ वाजता विवाह सोहळा होणार आहे. त्या त्या समाजाच्या रितीरिवाजानुसार हे विवाह होणार आहेत. सहभागी वधू-वरांना जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते, दानशूर व्यक्ती व संस्था यांच्याकडून मंगळसूत्र, वधूवर पोषाख, संसारोपयोगी भांडी संच तसेच वधू वरांकडील वºहाडी मंडळींचे भोजन, विवाहविधीसाठी लागणारे सर्व सोपस्कार या समितीतर्फे पुरविण्यात येणार आहेत.जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधिश प्रमोद तरारे, धर्मादाय सहआयुक्त प्रदीप घुगे, जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे, पोलीस अधीक्षक संजय पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सहायक धर्मादाय आयुक्त सुधीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय सामुहिक विवाह समिती स्थापन करण्यात आली आहे.दरम्यान, सोमवारी ७० जोडप्यांना वधू-वर पोषाख वाटप करण्यात आले.
नंदुरबारात ७० जोडप्यांचे होणार सामुहिक शुभमंगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 11:56 IST