प्रकाशा : दक्षिण काशी तीर्थक्षेत्र प्रकाशा येथील तापी नदी काठावर मंगळवारी मध्यरात्री दशामाता विसर्जनासाठी भाविकांचा जनसागर उसळला होता. रात्री ११ ते पहाटे पाचपर्यंत मंदिर परिसरासह दसा माता विसर्जनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी दिसून आली. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गेल्या वर्षी एकही मूर्ती विसर्जनाला आली नव्हती. यंदा मात्र, विसर्जनासाठी भाविकांचा जनसागर उसळल्याचे चित्र दिसून आले.
गुजरातसह महाराष्ट्रात गेल्या १० वर्षापासून दशा मातेचा उत्सव घराघरात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होताना दिसून येत आहे. मंगळवारी मध्यरात्री देवी विसर्जनासाठी प्रकाशासह शहादा, तळोदा, नंदुरबार मार्गाकडून रात्री ११ वाजेनंतर भाविक मंदिराकडे येताना दिसून आलेत. दरम्यान ११ ते एक वाजेपर्यंत तुरळक गर्दी होती. मात्र, एक वाजेनंतर भाविकांची गर्दी वाढण्यास सुरूवात झाली. पहाटे चारपर्यंत विसर्जनासाठी भाविकांची गर्दी कायम होती. दरम्यान पोलिसांनी चौफुलीवरच भाविकांना सूचना दिल्या. त्यामुळे भाविक आपले खाजगी वाहने पार्किंगला लावून पायी चालत घाटापर्यंत देवीचा जय जयकार करीत नदीकाठावर येताना दिसून येत होते. त्यामुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.
शहादा, तळोदा, नंदुरबार व गुजरातकडून दशामाता मूर्ती विसर्जनासाठी भाविक येत होते. विसर्जनासाठी आणलेल्या देवीला विविध वस्तुंनी शृंगार केलेला दिसून येत होता. या वेळी एक फुटापासून ते आठ फूट उंची पर्यंतच्या मूर्त्या दिसून आल्यात.
डोक्यावर मुकुट, हातात त्रिशूल, उंटावर विराजमान अशा सुंदर व आकर्षक मुर्त्या तापी घाटावर विसर्जनासाठी भाविक घेऊन येत होते. त्यात रिमझिम पाऊस सुरू असल्याने भाविकांच्या आनंदात अधिकच भर दिसून आला. घाटावर देवीची आरती झाल्यानंतर भाविक स्वतः तापी नदीच्या पात्रात जाऊन देवीला विसर्जन करीत होते. दरम्यान, तापी नदीवरील बॅरेजचे गेट गेल्या अनेक दिवसापासून बंद असल्याने भाविकांनी दगड धोंड्यातून मार्ग काढत नदी पात्रात ज्या ठिकाणी पाणी होते त्याठिकाणी जावून देवीच्या मूर्तीचे विसर्जन केले. एकंदरीत कोणताही अनुचित प्रकार न घडता दशामाता विसर्जन शांततेत पार पडले.
पोलिसांच्या चोख बंदोबस्त
शहाद्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी श्रीकांत घुमरे, पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत हे स्वतः मंदिराबाहेरील गेट जवळ रात्री नऊ वाजेपासून तर पहाटे पर्यंत प्रत्यक्ष थांबून होते. गर्दी होऊ नये म्हणून पावसात ते स्वतः पोलीस कर्मचाऱ्यांना वेळोवेळी सूचना देत पार्किंगची शिस्त लावत येणाऱ्या भाविकांना मार्गदर्शक सूचना देत होते. मंदिर परिसरात प्रकाशा पोलीस दूरक्षेत्राचे सुनील पाडवी, रामा वळवी यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत चोख बंदोबस्त ठेवला. तापी घाटावर विकास शिरसाठ, अजित नागलोद हे आपल्या पोलीस सहकाऱ्यांबरोबर देवीचे विसर्जन झाल्यानंतर तापी नदीच्या पात्रातून भाविकांना बाहेर काढत होते. सुमारे ऐंशी पुरुष, महिला व वाहतूक शाखेच्या पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
विद्युत रोशनाईची व्यवस्था
केदारेश्वर मंदिर व काशी विश्वेश्वर मंदिर संस्थांकडून विद्युतरोषणाईची व्यवस्था करण्यात आली होती. मंदिराबाहेरील चौफुली, मंदिराच्या मागे लावण्यात आलेले हायमस्ट लॅम्प व घाटावरील पथदिवे सुरू असल्याने भाविकांची सोय झाली. पथदिवे सुरू असल्याने भाविकांना तापी नदीचा घाटपासून तर नदीच्या पात्र पर्यंत जाणे सोयीचे झाले होते.
आपत्ती व्यवस्थापनाची बोट व कर्मचारी नाही
तापी नदी काठावर मध्यरात्री शेकडो भाविक येतात, अशाप्रसंगी दुर्घटना घडू नये यासाठी आपत्ती व्यवस्थापनाची बोट व पट्टीचे पोहणारे सज्ज राहायला हवे होते. मात्र या वेळी ते दिसून आले नाही. नंदुरबार जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाचा स्वतंत्र विभाग आहे. मात्र, त्या विभागाचे एकही अधिकारी आले नाही. प्रकाशाला स्वतंत्र बोट दिली आहे. अंधाऱ्याच्या ठिकाणी लावण्यासाठी टावर व फोकस दिला आहे. मात्र ते कुठेच नव्हते. शासनाने लाखो रूपये खर्च करून दिलेल्या या वस्तूंचा काय उपयोग असा प्रश्न भाविक उपस्थित करत होते.
मंदिर संस्थांचे सहकार्य
विसर्जन ठिकाणी गर्दी असते, अशा वेळी भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर संस्थांचे अध्यक्ष रामचंद्र पाटील, संचालक सुरेश पाटील, गुंडू पाटील, गजानन भोई आदी रात्रभर थांबून होते. आलेल्या भाविकांना सहकार्य करत होते.