नंदुरबार : अफगाणिस्तान पु्न्हा एकदा गृहयुद्धाला सामोरे जात आहे. यातून या ठिकाणी उत्पादित होणाऱ्या ड्रायफ्रूट अर्थात सुकामेव्याच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. परिणामी आपल्याकडील दरांमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.
अफगाणिस्तानातून प्रामुख्याने खसखस हा मसाला आणि सुकामेवा तसेच बदाम, अंजीर यांची निर्यात भारतात केली जाते. भारतात मागणी असल्याने ही निर्यात होते; परंतु तेथील युद्धामुळे येथील साठा वाढीची चिन्हे नसल्याने व्यापारी वाढीव दराने ड्रायफ्रूट विक्री करत आहेत. यातून नंदुरबारातील ठोक व्यापाऱ्यांनाही वाढीव दराने माल मिळू लागल्याने त्यांनी स्थानिक बाजारात विक्रीचे दर वाढवले आहेत.
साठा कमीच
भारतात प्रामुख्याने परदेशातून सुकामेवा आयात केला जातो. यंदा अमेरिका तसेच युराेप खंडातून होणारी निर्यात उत्पादनाअभावी कमी झाली आहे; परंतु मागणी वाढीव असल्याने दर वाढले आहेत.
कोरोना महामारीचा हा परिणाम असल्याचे सांगण्यात आले आहे. विमान व जलवाहतूक कमी झाल्याने दिल्लीच्या व्यापाऱ्यांकडे साठा कमी झाल्याची माहिती आहे.
बदामाच्या दरांनी अचानक उसळी घेतली आहे. ५४० रुपये किलोच्या दरावरुन थेट १ हजारांच्या पुढे बदाम गेले आहे. सर्वसामान्यांच्या आवाक्यात असलेला बदाम आता महाग झाला आहे. परिणामी मिठाई तसेच इतर पदार्थही येत्या काळात महाग होतील. येत्या काळात त्यांचे दर कमी होण्याची शक्यता कमीच आहे.
- विशाल चाैधरी, व्यावसायिक
सुकामेव्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. भारतात त्याचे उत्पादन कमी असल्याने दर वाढले आहेत. निर्यातीचा खर्च वाढत असल्याने व्यापारी दरवाढ करत आहेत. ही परिस्थिती कमी होईल अशी कोणतीही शक्यता नाही. नागरिक त्रागा करतात; परंतु व्यापारीच वाढीव दरात देत असल्याने नाइलाज आहे.
- ज्ञानेश्वर पाटील, व्यावसायिक