मनोज शेलार।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबारचा प्रसिद्ध गणेशमूर्ती उद्योग यंदा प्रचंड संकटात सापडला आहे. चार फुटापेक्षा अधीक उंचीची मूर्ती नको आणि गणेशोत्सवावर आलेल्या मर्यादा यामुळे मूर्तीची नोंदणी घटली आहे. त्यामुळे मूर्ती कारागिरांवर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. यातून बाहेर काढण्यासाठी शासनाने मूर्ती कारागिरांना आर्थिक पॅकेज जाहीर करावे अशी अपेक्षा नंदुरबारातील गणेश मूर्ती कारागिर संघटनेचे अध्यक्ष मनोज वसईकर यांनी ‘लोकमत’शी बोलतांना व्यक्त केली.शासन निर्णयाचा मूर्ती व्यवसायावर काय परिणाम झाला?यंदा कोरोनामुळे राज्य शासनाने सार्वजनिक गणेश मंडळांवर उत्सव साजरा करण्यासाठी अनेक निर्बंध घातले आहेत. चार फुटापेक्षा अधीक उंचीची मूर्ती नको, घरगुती दोन फुटापेक्षा अधीक उंचीची मूर्ती नको आहे. वास्तविक नंदुरबारातील कारागिर किमान पाच ते २० फूट उंचच्या मूर्ती तयार करतात. जिल्ह्यासह गुजरात व मध्यप्रदेशातील मंडळे दोन ते तीन महिने आधी नोंदणी करतात. यंदा दरवर्षाच्या नोंदणीच्या हिशोबाने हजारो मूर्ती तयार करून ठेवल्या, परंतु चार फूट उंचीची मर्यादा आल्याने मूर्ती व्यवसायावर संकट ओढावले आहे.आलेल्या संकटाला कसे सामोरे जाणार?नंदुरबारची मूर्ती कला राज्यात प्रसिद्ध आहे. साधारणत: जानेवारी महिन्यापासून मूर्ती कारखान्यात काम सुरू होते. यंदा दिवाळीपासूनच काम सुरू करण्यात आले. सुरुवातीला ८ ते २० फूट उंच मूर्तीचे काम करावे लागते. त्यानुसार ते मार्च पर्यंत केले, परंतु अचानक कोरोनाचे संकट आले आणि चार फूट उंच मूर्तीचा निर्णय झाला. त्यामुळे ८ ते २० फूट उंचीच्या मूर्तीचे आता करायचे काय? हा प्रश्न आहे. जिल्हाबाहेरील आणि गुजरातमधील अनेक मंडळांनी आॅर्डर रद्द केल्या. नवीन आॅर्डरही नाहीत. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान मूर्ती कारागिरांचे झाले आहे. आता वर्षभर या मूर्ती सांभाळण्याचे नवे आव्हान राहणार आहे.
संडे स्पेशल मुलाखत- नंदुरबारचा प्रसिद्ध गणेश मूर्ती उद्योग आला संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 12:47 IST