प्रतापपूर : तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथे एका झाडाखाली शंभरहून अधिक मृत वटवाघळांचा सडा पडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे़ तीव्र तापमानामुळे होरपळून वटवाघळांचा मृत्यू झाल्याचा अंदाज तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ़ किशोर सामुद्रे यांनी व्यक्त केला आहे़प्रतापपूर येथील बसस्थानक परिसरात मोठ्या संख्येने वृक्ष असून येथे वटवाघळांचे वास्तव्य आहे़ गेल्या काही दिवसांपासून नंदुरबारातील तापमानात वाढ झालेली आहे़ तापमान वाढीसोबत पशु-पक्षांना पाण्याचे दुर्भिक्षही जाणवत आहे़ वाढत्या तापमानामुळे पक्षांवर दुष्परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे़ त्यातच मुबलक पाणी न मिळाल्याने या सर्वांतून वटवाघळांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे़दरम्यान, सदर मृत वटवाघळांची पाहणीसाठी तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ़ किशोर सामुद्रे यांनी भेट दिली़ सदर वटवाघूळांचा मृत्यू उच्च तापमान व पाण्याच्या कमरतेमुळे झाल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले़ मृत वटवाघळांची विल्हेवाट लावण्यासाठी मार्गदर्शन करुन पक्षांना ठिकठिकाणी पिण्यासाठी पाणी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले़ सरपंच रोहिदास पावरा, ग्रामसेवक प्रकाश कोळी यांनी स्वच्छता पथकातील कर्मचाऱ्यांमार्फत मृत पक्षांना गोळा करुन १० फूट खोल खड्डयात पुरले़ मागील वर्षीदेखील तळोद्यात तापमान वाढ व पाण्याअभावी काही कावळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती़ वाढत्या तापमानामुळे पशु-पक्षांवर परिणाम होत असल्याने पशुप्रेमींकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे़ घटनेची चौकशी करण्याची मागणी आहे़
वटवाघळांच्या अचानक मृत्यूने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 12:01 IST