नंदुरबार : जनमानसांत तिखट आणि मसालेदार पदार्थ खाण्याकडे कल आहे. त्यात फास्टफूडला सर्वाधिक पसंती दिली आहे; परंतु ही पसंती अल्सरसारख्या गंभीर आजाराला आमंत्रण देणारी ठरत आहे. यामुळे वेळीच नियंत्रण मिळविले नाही मोठ्या संकटाला सामाेरे जावे लागते.
बदलत्या काळानुसार खाद्यपदार्थ, भाजीपाला यांच्यात बदल झाला आहे. आवडी-निवडीही बदलल्या आहेत. कमी वेळेत मिळेल ते खाऊन अनेक जण भूक भागवत आहेत. योग्य किंवा पाैष्टिक आहार या संकल्पनेचा जणू काही अस्त झाला आहे. त्यात नियमित व्यायाम आणि योगासने करण्याकडेही दुर्लक्ष होत आहे. परिणामी पोटाच्या विविध तक्रारी नागरिकांमध्ये बळावत आहेत. त्यातून अल्सरची तक्रार प्रामुख्याने समोर येत आहे.
तिखट आणि मसालेदार पदार्थ खाण्यामध्ये अधिक असल्याचे समोर आले आहे. अति प्रमाणात तिखट आणि मसालेदार खाणे आरोग्यासाठी घातक ठरत असतानाही अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. अल्सरमुळे आतड्याला, जठरला जखम होते. योग्य उपचार आणि पथ्य केल्यास अल्सर बरा होऊ शकतो; परंतु धूम्रपान, तंबाखू, गुटखा, दारूचे सेवन करणे, वेळी-अवेळी मसालेदार तसेच जंक फूडचे सेवन धोकादायक ठरते.
तिखट, मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन करू नये. सातत्याने पोटाचा विकार उद्भवल्यास तज्ज्ञ डाॅक्टरांच्या सल्ल्याने वेळीच उपचार घ्यावेत.
भूक लागली नसताना विनाकारण खाणे टाळावे. अल्सर होऊ नये याकिरता पाैष्टीक आणि सकस आहार घेणे आवश्यक आहे. शरीरातील उष्णता नियंत्रणात आणणाऱ्या पदार्थांचे, फळांचे सेवन करावे.
एन्डोस्कोपी केल्यावर अल्सरचे निदान हेाते. यानंतर पातळ औषधे, गोळ्या असे पूर्णत: उपचार घेणे आवश्यक आहे. खासगी तसेच सरकारी दवाखान्यांमध्येही उपचार उपलब्ध आहेत.
नागरीकांनी बाहेरचे खाणे टाळले पाहिजे. नियमित आणि संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. योग्य त्यावेळी योग्य तेवढा आराम केला पाहिजे. पोटातील दुखणे किंवा इतर तक्रारी असल्यास योग्य त्या तज्ञांचा सल्ला घेत उपचार घेतले पाहिजेत. आजार बळावण्याची शक्यता दिसू लागताच उपचारांना सामोरे गेले पाहिजे. - डॉ .राजेश वळवी, नंदुरबार.
पोट दुखणे
मळमळ होणे
भूक मंदावणे
काळ्या रंगाचा शाैच होणे
ॲसिडिटी वाढणे
पोटात आग होण्यासह इतर लक्षणे आहेत. या सर्वातून अनेकवेळा मानसिक आरोग्य हिरावते.