निवेदनात म्हटले आहे की, शहादा तालुक्यातील लंगडी भवानी गावात १८ रोजी जमावाने अतिक्रमण करण्याच्या हेतूने सुमारे सात हेक्टर क्षेत्रावरील वृक्ष वनरक्षकासमोर एका तासात तोडून टाकल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. या घटनेने जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमींना धक्काच बसला असून, या घटनेचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो व कठोर कारवाईची मागणी करीत आहोत, तसेच यासारख्या लहान-मोठ्या वृक्षतोडीच्या घटना सातपुड्यातील इतर भागातही घडत असतात. त्यांच्यावरही योग्य ती कायदेशीर कारवाई करून वृक्षतोडीला पायबंद घालावा. कारण सातपुड्यातील अनेक टेकड्या वृक्षतोड व त्याच्या परिणामाने उघड्या, बोडक्या झाल्या असून, गवत उगविण्याच्या लायकही राहिल्या नाहीत आणि अशीच वृक्षतोड होत राहिली, तर एक दिवस सातपुड्याचे वाळवंटीकरण झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे संबंधितांवर वेळीच कारवाई करून वनसंपदेचा व पर्यावरणाचा ऱ्हास थांबवावा, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी योगिनी पाडवी, जिजाबराव पाटील, विनोद वाघ, अभिजित वाघ, धनजी वळवी, मुन्ना पावरा, वीरेंद्र पाडवी व सुभाष पाडवी हे पर्यावरण हितचिंतक उपस्थित होते.
सातपुड्यातील पर्यटनस्थळावर कचरा करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
सध्या सातपुडा पर्वत हिरवाईने नटलेला असून, त्याचा आनंद लुटण्यासाठी विविध भागांतून पर्यटक डाब, दहेल घाट, वाल्हेरी, कुंडलेश्वर, चांदसैली घाट, बिलगाव धबधबा, उनपदेव, तोरणमाळ इत्यादी पर्यटनस्थळी भेटी देत आहेत. मात्र, येताना सोबत फरसाण, वेफर्स, बिस्कीट, बीअर इत्यादी सोबत आणून त्याचा कचरा पर्यटनस्थळी सोडून जात असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे प्लॅस्टिक प्रदूषण वाढून निसर्गाचे विद्रूपीकरण होत आहे. त्यामुळे पर्यटनस्थळांवर गस्ती पथकांची नेमणूक करून, संबंधितांवर कठोर कारवाई करावी व विशेष स्वच्छता मोहीम राबवून आपल्या अखत्यारीतील सातपुडा कचरा मुक्त करावा, असे निवेदन वनार्थ संस्थेच्या वतीने उपवनरक्षकांना देण्यात आले.