नंदुरबार : पावसाळ्यात कुपोषण व बालमृत्यूचे प्रमाण वाढू नये यासाठी जिल्ह्यातील सर्व पोषण पुनर्वसन केंद्र व बाल उपचार केंद्र अद्ययावत ठेवून त्यात बालकांना दाखल करून घेण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी काढले आहेत. ‘लोकमत’ने याबाबत वृत्त देताच प्रशासन स्तरावर हालचाली गतिमान झाल्या आहेत.
जिल्ह्यातील पोषण पुनर्वसन केंद्र बंद असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने तातडीने ते सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत जिल्हा परिषदेेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, जिल्ह्यात मार्च २०२१च्या मासिक अहवालानुसार ९०८ सॅम तर आठ हजार ५२१ मॅम बालके आहेत. या बालकांवर ग्राम बालविकास केंद्र तसेच बाल उपचार केंद्र/पोषण पुनर्वसन केंद्रामध्ये तातडीने उपचार करण्यासाठी सूचीत करण्यात आले आहे.
सद्य:स्थितीत जिल्ह्यातील बहुसंख्य आदिवासी कुटुंब स्थलांतराहून परत आलेली आहेत. या कुटुंबांमधील सहा वर्षांखालील बालकांमध्ये कुपोषित बालके तसेच आरोग्य समस्या असणाऱ्या बालकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दरवर्षी जिल्ह्यात मान्सूनपूर्व विशेष आरोग्य तपासणी मोहिमेअंती प्राप्त अहवालामध्येसुद्धा कुपोषित आणि आजारी बालकांच्या संख्येत वाढ झाल्याचे निष्पन्न झालेले आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यात सॅम, मॅम आणि आरोग्य समस्या असणाऱ्या बालकांवर वेळेवर उपचार करणे आवश्यक आहे. अन्यथा मान्सून कालावधीत जिल्ह्यात बालमृत्यूचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे सर्व पोषण पुनर्वसन केंद्र व बाल उपचार केंद्रामधील सेवा पूर्णवेळ संपूर्ण मनुष्यबळ, आहार व औषध साठ्यासह अद्ययावत ठेवावे, असेही या पत्रात मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी स्पष्ट केले आहे.