लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार/शहादा : भारतीय कपास निगम लिमिटेड अर्थात सीसीआयद्वारा येथे कापूस खरेदीला नंदुरबार व शहादा बाजार समितीअंतर्गत खरेदी केंद्रावर गुरुवारपासून प्रारंभ झाला आहे. शहादा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत तर नंदुरबार केंद्राचा पळाशी येथील केंद्रावर शुभारंभ झाला. पळाशी येथील केंद्रावर पहिल्या दिवशी एक हजार क्विंटल कापसाची आवक झाली होती.कृषी उत्पन्न बाजार समिती नंदुरबार अंतर्गत स्व.राजीव गांधी कापूस खरेदी केंद्र पळाशी येथे भारतीय कपास निगम (सी.सी.आय.) मार्फत किमान आधारभूत किंमत (हमी भावाने) कापूस खरेदीचा शुभारंभ गुरूवारी जि.प.चे उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी बाजार समितीचे सभापती दिनेश पाटील, उपसभापती रागिनी पाटील, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी.के. पाटील, मजूर फेडरेशनचे चेअरमन अंकुश पाटील, बाजार समितीचे संचालक हिरालाल पाटील, रवींद्र परदेशी, आनंदराव कदमबांडे, संभाजी वसावे, सयाजीराव मोरे, भरत पाटील, देवमन पवार, हरिश्चंद्र पाटील, किशोर पाटील, रोहिदास राठोड, भैय्याभाऊ गिरासे, नवीन बिर्ला, परवेज खान, बापू पाटील, भारतीय कपास निगम (सीसीआय)चे केंद्रप्रभारी तिवारी, बाजार समितीचे सचिव, कर्मचारी व खरेदीदार उपस्थित होते. पळाशी येथील कापूस खरेदी केंद्रात ४५ वाहनांमधून कापूस विक्रीस आला व साधारणतः एक हजार क्विंटल कापूस आवक झाली होती. तसेच नोंदणीकृत शेतकऱ्यांनी आपला कापूस स्वच्छ व कोरडा करून विक्रीस आणावा. तसेच भारतीय कपास निगम (सीसीआय)मार्फत खरेदी केलेल्या कापसाचे चुकारे संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार असल्याने हमाली व अनुषांगिक खर्चाची रक्कम संबंधितांकडे रोख स्वरुपात अदा करावी, असे आवाहन बाजार समितीचे सभापती व सचिव यांनी केले.शहादाशहादा येथे सीसीआयमार्फत गुरुवारपासून कापूस खरेदीचा शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी सहायक निबंधक नीरज चौधरी, बाजार समितीचे सचिव संजय चौधरी, सीसीआयचे ग्रेडर किटुकले, श्रीजी कोटेक्सचे अजय गोयल, राधिका कॉटनचे कैलास पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी आणताना एका वाहनासोबत एक शेतकरी व चालक असणे बंधनकारक असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळत शेतकऱ्यांनी सहकार्य करावे. खरेदी केंद्रावर १२ टक्के आद्रतेखालील कापूस विक्रीसाठी आणावा. खरेदी केंद्रावर आठ टक्के आद्रतेच्या कापसास पाच हजार ७२५ रूपये, नऊ टक्के आद्रतेचे कापसास पाच हजार ६६७, १० टक्के आर्द्रता असलेल्या कापसास पाच हजार ६१० रूपये, ११ टक्के आद्रतेच्या कापूसला पाच हजार ५५३ तर १२ टक्के आद्रतेचे कापसाला पाच हजार ४९६ भाव सीसीआयमार्फत देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी कापूस खरेदी केंद्रावर १२ टक्के आद्रतेच्यावरील कापूस विक्रीसाठी आणू नये, अशी माहिती बाजार समितीचे सभापती सुनील पाटील यांनी दिली.
शहादा व नंदुरबारात कापूस खरेदीला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 13:03 IST