लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह प्रवेश प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेंद्रकुमार गावीत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना निवेदन दिले आहे.या निवेदनात २०२०-२१ शैक्षणिक वर्षात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शालेय व महाविद्यालय प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. या पार्श्वभूमिवर विद्यार्थी तात्पुरते प्रवेशित झाले आहेत. परंतु अद्याप वस्तीगृह प्रवेश प्रक्रिया मात्र सुरू झालेली नाही. विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया ही दरवर्षी ऑनलाईन पध्दतीने पार पाडली जाते. मात्र संबंधित विभागाची साईट बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वारंवार वस्तीगृहात फेऱ्या माराव्या लागत आहेत. यातही बऱ्याच विद्यार्थ्यांचे तात्पुरते प्रवेश झाले आहेत. यातून त्यांचे वस्तीगृह प्रवेश नसल्यास राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना कोरोना महामारीच्या काळात आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अकरावीच्या विद्यार्थ्यांचे वस्तीगृह रिन्युअल फॉर्म भरण्याची प्रक्रियाही तातडीने सुरू करण्यात यावी. तसेच वस्तीगृह ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात यावी, यासाठी हा मुद्दा राज्यस्तरावर मांडून तो मार्गी लावण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या विषयावर मुख्यमंत्र्यांशी लवकरच संवाद साधणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी आमदार राजेश पाडवी, नंदुरबार भाजप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, नवापूर तालुकाध्यक्ष भरत गावीत, सरचिटणीस नीलेश माळी हे उपस्थित होते.
आदिवासी वसतीगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 12:09 IST