शहादा : सातपुडा साखर कारखान्याचे सन २०२१-२२ या वर्षाचा गाळप हंगाम सुरू करण्याकामी हंगाम पूर्व मशिनरी दुरूस्ती व देखभाल कामांना वेग आला आहे. सोमवारी पहिल्या मिलचे रोलर विधीवत पूजन कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील व संचालक मंडळाच्या उपस्थितीत करण्यात आले.सातपुडा कारखान्याचा सन २०२१-२२ चा गाळप हंगाम सुरू करण्याच्या दृष्टीने १ जुलै २०२१ पासून कामगारांना कामावर घेण्यात आले असून, मिशनरीची देखभाल व दुरूस्तीची कामे वेगात सुरू असून, पहिल्या मिलचे प्रथम रोलरचे पूजन करण्यात येवून बसविण्यात आले. या वेळेस कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, व्हाईस चेअरमन प्रेमसिंग अहेर, मंडळाचे सदस्य, कार्यकारी संचालक पी.आर. पाटील तसेच अधिकारी व कामगार उपस्थित होते.
या वर्षी कारखान्याकडे सभासदांच्या उसाच्या पेमेंटला उशिर झाला असून, ते लवकरच पूर्ण करण्याचा प्रयत्न व्यवस्थापननाकडून केला जात असून, यावर्षी कारखाना सुरू होणार की, नाही याबाबत अनेक शेतकऱ्यांच्या मनात शंका आहे. परंतु गेल्यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रात आणि बाहेरही मोठ्या प्रमाणात ऊस लागवड झालेली आहे. आपल्या कारखान्यात जवळपास २६ हजार एकरचा जवळपास ऊस नोंद झालेली असून, ऊसतोड यंत्रणेसाठी ॲडव्हान्स वाटप झाले असून, तीन हजार २०० डोके सेंटर काेयते, १५० टायगर गाडी, २१६ गाडी सेंटर आणि सहा हार्वेस्टर मशिन यांचेशी कराराचे कामकाज सुरू असून, वाहतुकीसाठी २५० ट्रक व ट्रॅक्टर यांचेही करार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे कारखाना गाळप हंगाम पूर्णक्षमतेने चालविण्यासाठी कारखान्यांचे व्यवस्थापन व अधिकारी नियोजन करीत आहेत.