नंदुरबार : अनलाॅकमुळे एसटी बसेस धावू लागल्या आहेत. सोबतच बसस्थानकावर अवलंबून असलेला रोजगारही खुला झाला असून बसमध्ये विविध पदार्थ विक्री करून गुजराण करणाऱ्यांच्या संसाराची गाडीही पुन्हा रुळावर आली आहे. नंदुरबार बसस्थानकात सध्या ऐन भरात कामकाज सुरू असून प्रवाशांच्या गरजेनुसार खाद्यपदार्थ, थंड पेये यांसह विविध वस्तूंची विक्री सुरू आहे.
जुन्या बसस्थानकाची इमारत पाडून प्रशस्त अशा संकुलासह नवीन बसस्थानक काही वर्षांपूर्वी तयार करण्यात आले होते. याठिकाणी करार तसेच भाडेतत्त्वावर जागा घेत अनेकांनी व्यवसायही सुरू केले आहेत. दरम्यान, यात अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनाही जागा देण्यात आली आहे. गेल्या दीड वर्षात लाॅकडाऊनमुळे या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले होते. दुसऱ्या लाॅकडाऊनमुळे फेरीवाल्या विक्रेत्यांना बेरोजगारीची झळ बसून त्यांच्या संसारावर मोठा परिणाम झाला होता.
नंदुरबार बसस्थानकात चहा विक्रीची दुकाने आहेत. याठिकाणी पुन्हा जुन्या दिवसांसारखीच गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. चहासोबत खाद्यपदार्थ विक्रीही होत असल्याने बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांची सोय होत आहे.
खाद्यपदार्थांसोबत थंड पेये आणि पाणी विक्री गेल्या काही वर्षात बसस्थानकात सुरू झाली आहे. पाण्याच्या बाटल्या विक्री करणारे फेरीवाले पुन्हा नजरेस पडत असून त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद दिसून येत आहे.
विशेष अशा आवाजात एसटीतील प्रवाशांसाठी खाद्यपदार्थ विक्रीची एक पद्धत आहे. बऱ्याच दिवसांनी विक्रेत्यांचा तो वेगळा आवाज कानी पडत असल्याने बसमधील प्रवासीही आता त्यांना साद घालू लागले असल्याचे चित्र स्थानकात आहे.
एसटीकडून परवानगी...
n कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनमुळे इतिहासात प्रथमच एसटीची धावणारी चाके बंद पडली होती. यातून त्यावर आधारित रोजगारही थांबला होता. स्थानकात विविध पदार्थ विक्री करणाऱ्यांना एसटीकडून परवानगी दिली जाते. अनलाॅकनंतर या विक्रेत्यांचा कोविड रिपोर्ट आणि लसीकरण प्रमाणपत्र तपासून त्यांना परवानगी देण्यात आली.
n स्थानकातील दुकानांतून साहित्य घेत त्यांची बसमध्ये विक्री करणाऱ्यांची संख्या मात्र घटली असल्याचे सांगण्यात आले. येथील रोजगार संपल्याने इतरांनी दुसऱ्या कामांकडे मोर्चा वळवल्याची माहिती दिली गेली आहे.