लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातून दरवर्षी होणारे स्थलांतर आणि शेतीकामांसाठी वाढता यंत्रांचा वापर याचा फटका शेतक-यांना बसतो आहे. परिणामी शेतीकामांसाठी मजूर मिळत नसल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. सर्व काही मिळेल परंतू मजूर मिळत नसल्याने शेतकरी अक्षरश: मेटाकुटीला येत आहेत. नंदुरबार तालुक्याच्या विविध भागात खरीप आणि रब्बी पिकांच्या पेरण्या पूर्ण करण्यात आल्यानंतर त्यांचे संगोपन, फवारणी, कोळपणी, निंदणी, कापणी व वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याचे चित्र गेल्या काही वर्षात आहे. यातून धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातून मजूर शेतीकामांसाठी नंदुरबार तालुक्यात येतात. हीच गत तळोदा व शहादा तालुक्यातील आहे. याठिकाणी मजूर संख्या कमी असल्याने अडचणी येतात. मजूरही रोजंदारीपेक्षा क्षेत्रानुसार पैसे घेत काम पूर्ण करुन देतात. नवापूर, धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातून स्थलांतरीत झालेल्या मजूरांमुळे अनेक अडचणी येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. मजूरी वाढवून देण्याची तयारी दर्शवूनही अनेकवेळा मजूर मिळत नाहीत.
मजुरीचा दर पाच वर्षापूर्वीचा दर पुरुष मजूर : १०० रुपयेमहिला मजूर : १०० रुपये
यंदाचा मजुरी दर पुरुष मजूर : १५० रुपयेमहिला मजूर : १५० रुपये
यंत्राने होणारी कामेपिक पेरणी, लागवड, कोळपणी आदी कामे यंत्राच्या माध्यमातून करण्यात येतात. नांगरटीसाठीही बरेच जण मजूरांऐवजी ट्रॅक्टरने नांगरटी करतात.
कृषी यंत्रांचा वाढता वापर, मजूरांना नकार शेतीकामांसाठी मजूरांचा वापर कमी होण्यात यांत्रिकीकरणाचाही मोलाचा वाटा आहे. शेतक-यांनी ट्रॅक्टर खरेदीसाेबत शेतीपयोगी इतर यंत्रेही खरेदी केल्याने शेतीतील अडचणी दूर झाल्या आहेत. फवारणी करण्यासाठी ब-याच जणांकडे यंत्रे असल्याने मजूरांना मिळणारी मजूरी इतिहासजमा झाली आहे.
मजूर मिळवण्यासाठी धावपळ
नंदुरबार तालुक्यातील बहुतांश मोठे शेतकरी धडगाव, अक्कलकुवा तसेच तळोदा तालुक्यात जावून मजूर आणतात. हे मजूर दररोज येतात. त्यांचा वाहतूक खर्च द्यावा लागतो. वेळप्रसंगी त्यांना जेवणासाठीही खर्च करावा लागत असल्याचे बामडो येथील शेतकरी वसंत हिरामण पाटील यांनी सांगितले.
तळोदा तालुक्यातील सर्वच भागात मजूरांची संख्या कमी आहे. यातून रोजंदारीने काम करण्यापेक्षा क्षेत्र ठरवून ठोक दरांमध्ये काम करण्यावर भर दिला जातो. मजूरांची संख्या कमी असल्याने शेतक-यांच्या कामांचे नियोजन चुकत असल्याचे मोड ता. तळोदा येथील शेतकरी पुरुषोत्तम चव्हाण यांनी सांगितले.
रांझणी ता. तळोदा येथील निंबा नामदेव गवळी यांना संपर्क केला असता, मजूरांची संख्या कमी झाली आहे. दोन्ही हंगामात मजूर मिळणे ही मोठी गोष्ट असते. यातही शेतीचे संपूर्ण ज्ञान असलेले मजूर कमी झाले आहेत. शेतीकामात पारंगत असलेले मजूर मिळत नसल्याने कामांचे नियोजन चुकते. यातून ब-याच शेतक-यांचे नुकसानही होते.