लोकमत न्यूज नेटवर्कनवापुर : शहरात डेंग्यु सदृश्य तापाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. देवळफळी भागात मंगळवारी सात संशयित रुग्ण आढळून आले आहेत़ सातही जण गुजरातच्या वेगवेगळ्या भागात उपचारासाठी रवाना झाल़े दरम्यान आरोग्य विभागाने सोमवारी घेतलेले संशयित रुग्णांचे रक्त नमुने वाया गेल्याने मंगळवारी पुन्हा नमुने घेण्यात आले.गेल्या शुक्रवारी 17 तर शनिवारी 11 वर्षीय बालकाचा डेंग्यू सदृश तापामुळे मृत्यू झाला होता़ शहरातील नारायणपूर रोड, शास्त्रीनगर व शितल सोसायटी या भागात डेंग्युसदृश तापाचे रुग्ण आढळुन आल्यानंतर मंगळवारी देवळफळी या भागातही सात रुग्ण आढळून आले. आधीच व्यारा, बारडोली व सुरत येथे शहरातील 40 पेक्षा अधिक रुग्ण दाखल आहेत. तालुका आरोग्य विभागाकडून औषध फवारणीच्या तीन यंत्राच्या सहाय्याने फवारणीचे काम मंगळवारीही सुरु ठेवण्यात आले. सहाय्यक जिल्हा हिंवताप अधिकारी डॉ. बागले व तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. हरिश्चंद्र कोकणी यांनी काल शहरातील प्रभावित भागातील काही संशयित बालकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. प्रत्यक्षात रक्ताचे नमुने घेतांनाच काही चुका झाल्याने मंगळवारी प्राप्त होणारा अहवाल उपलब्ध होऊ शकला नाही. जिल्हा हिंवताप अधिकारी डॉ. ढोले यांनी त्याच भागात भेट देऊन रक्ताचे नमुने पुन्हा घेतले. नागरिकांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केल्यानंतर डॉ. ढोले यांनी त्यांची समजूत काढली. रक्ताचे नमुने तपासणीसाठी तातडीने नंदुरबार येथे पाठवून बुधवारी त्यांचा अहवाल उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिल्यानंतर रक्ताचे नमुने देण्यासाठी नागरिक तयार झाल़े शहरातील प्रभावित भागाची व्याप्ती वाढत असल्याने लोकांच्या चिंतेत भर पडत आहे.
दरम्यान उपजिल्हा रुग्णालयात डेंग्यु सदृश रुग्णांच्या देखभालीसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला आहे. डेंग्यु तपासणी किट मागविण्यात आल्या आह़े मात्र एकही डेंग्यु प्रभावित रुग्ण उपचारासाठी आलेला नाही अशी माहिती वैद्यकिय अधिक्षक डॉ़ किर्तीलता वसावे यांनी दिली.