सुरक्षा सप्ताहामध्ये सुरक्षित प्रवास करण्यासाठी प्रवाशांना वाहकांकडून व बस स्थानकात वारवांर सूचना देण्यात येत आहे. प्रवाशांनी बसमध्ये दरवाजा जवळ न थांबता सीटवर बसावे, खिडकीतून डोके बाहेर काढणे धोक्याचे आहे. अशा विविध सूचना वारंवार देण्यात येत आहे. कोरोनासदृश परिस्थिती असल्याने बसला निर्जंतुक करण्यात येत आहे. प्रवाशांनी जीव धोक्यात घालून प्रवास न करता बसने प्रवास करावा, असे आवाहन फलक बसेसमध्ये लावण्यात येत आहे.
प्रवाशांमध्ये सुरक्षित प्रवासाबद्द्ल विश्वास वृध्दिंगत करण्याकरिता १८ जानेवारीपासून चालक व वाहकांचेे गट तयार करण्यात येऊन सुरक्षित वाहतुकीसाठी नियमावली आगारकडून देण्यात आली. सुरक्षा सप्ताहामध्ये चालकांच्या वाहन चालविण्याच्या सवयींवर विशेष लक्ष देण्यात आले़. तसेच आतिवेगाने बस चालविणे, चुकीच्या पध्दतीने पुढील वाहनास ओलांडून जाणे, अरुंद पुलावरुन समोरुन वाहन येत नसेल तरच राज्य परिवहन वाहन पुलावर नेणे, अनधिकृत थांब्यावर बस थांबविणे यापासून चालकांना परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
या कालावधीत वाहनांमधील दोष व वाहन चालविण्यामधील दोष या मुद्यांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. सर्व राज्य परिवहन कर्मचा-यांच्या मनामध्ये सुरक्षित वाहतुकीच्या जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. सुरक्षित प्रवासासाठी वर्षभरात विना अपघात सेवा कालावधी पूर्ण करणाऱ्यांना पारितोषिक, सन्मानचिन्ह, बिल्ला व बक्षीस येत्या २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी देण्यात येणार आहे.
रस्त्यात बस नादुरुस्त होऊन अपघात होण्याआधी काळजी केली जाते. आगारातून बाहेर पडणारी प्रत्येक बस मार्गावर धावण्याच्या निर्दोष स्थितीत असल्याबाबत आभियांत्रिकी कर्मचाऱ्यांनी खात्री केल्याशिवाय बसची फेरी करण्यात येऊ नये. चालकाने वाहनातील दोष निदर्शनास आणले असता, या दोषांचे पूर्णपणे निराकरण करण्यात आल्यानंतरच वाहन मार्गावर पाठविण्यात येते. सुरक्षितता मोहीम कालावधीत ज्या चालकांना प्रशिक्षणासाठी बोलविण्यात आले, त्या चालकांना अपघाताचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात येऊन कोणत्या चुकीमुळे अपघात होतात, त्या चुका निदर्शनास आणून दिले जात आहे.
चालकांनी वाहन चालवतांना दक्षता घेणे महत्वाचे असून आपल्यावर ४० प्रवाशांना इच्छित स्थळी सुखरूप सोडण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे बसला अपघात न होण्यासाठी सर्व प्रकारची काळजी घेण्यात येत आहे.
- मनोज पवार, आगार व्यवस्थापक नंदूरबार
बसमध्ये चढताना विद्यार्थ्याकडून चेंगराचेंगरी होत असते, सुरक्षा पोलीस बघ्याची भूमिका घेतात, महिलांना व विद्यार्थिनीना सुरक्षित बस प्रवास करण्यासाठी मानव विकास अंतर्गंत महिला बस सुरू करण्यात आली होती, ती बंद असून महिला बस पुन्हा सुरू करण्यात यावी
-ममता मिस्तरी, प्रवासी विद्यार्थिनी
चालकांकडून बऱ्याचवेळा बसस्थानकांतून बस काढताना घाई करण्यात येते त्यामुळे बसमध्ये चढताना अपघात होण्याची शक्यता असते, मुले खिडकीतून बसमध्ये प्रवेश करतात त्यावर सुरक्षा पोलिसांनी कारवाई करावी.
- दरबारसिंग गिरासे, प्रवासी