सोमवारी सकाळी पारंपरिक पद्धतीने कानुबाईच्या मुखवट्याचे विसर्जन करण्यात आले. यंदा कोरोनामुळे मिरवणुकांवर बंदी असल्यामुळे साध्या पद्धतीनेच विसर्जन करण्यात आले. शहरातील पाताळगंगा नदीत दरवर्षी विसर्जनासाठी गर्दी असते. यंदा पाऊसच नसल्याने नदीला पाणी नाही. त्यामुळे विसर्जन कुठे करावे, हा प्रश्न भाविकांपुढे निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेता पालिकेतर्फे तसेच खासगी व्यक्तींनी पाण्याचा टँकरची व्यवस्था करून दिली होती. टँकरद्वारे पाणी नदीच्या डोहात टाकून तेथे विसर्जन करण्यात आले.
यंदाची दुष्काळी परिस्थिती दूर होऊ दे, येत्या दिवसात मुसळधार व नदी, नाले वाहतील असा पाऊस होऊ दे, कोरोनाचे संकट कायमस्वरूपी दूर कर, असे साकडे घालत कानुबाईला निरोप देण्यात आला.
दरम्यान, पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात केला होता. सार्वजनिक मिरवणुका निघणार नाहीत याची काळजी घेण्यात येत होती.