नंदुरबार : शासकीय अनुदानित आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे वेतन पूर्वीप्रमाणेच काऊंटर सिग्नेचर पद्धतीने सुरू करावे, अशी मागणी आदिवासी विकास आश्रमशाळा कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोन ते तीन महिन्यांच्या उशिराने वेतन अदा होत आहे.
याबाबत नंदुरबार प्रकल्पस्तरीय कर्मचारी संघटनेने सहायक प्रकल्प अधिकारी नंदकुमार साबळे यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्त शासकीय अनुदानित आश्रमशाळेचे वेतन कोरोनाचे कारण देत दोन ते तीन महिन्यांच्या विलंबाने होत आहे. ग्रामविकास विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व जिल्हा परिषद खासगी व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांचे वेतन दरमहा १० तारखेपूर्वी होते. मग आदिवासी विकास विभागाबाबत दुजाभाव का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. विलंबाने होणाऱ्या वेतनामुळे कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
इतर विभागाप्रमाणे दर महिन्याच्या १ तारखेला वेतन मिळावे. यासाठी एक महिना आधीच वेतन तरतूद उपलब्ध करून द्यावी तसेच पूर्वीप्रमाणे विभाग प्रमुखांची प्रतिस्वाक्षरी अर्थात काऊंटर सिग्नेचरची पद्धत अवलंबवावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष पी.आर. पाटील, उपाध्यक्ष एन.ए. पाडवी, आर.जे.मराठे, एस.आर. पाटील, एस.एस. पाटील, प्रितम वळवी, आर.पी. वळवी, वाय.के. ओगले, ए.वाय. कोकणी व पदाधिकारी उपस्थित होते.