लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : सातपुड्यात जागोजागी निलिचारी निसर्ग देवतांचे पूजन होत आहे़ संपूर्ण विश्व कोरोनामुक्त होवून आरोग्यसमृद्धी नांदावी अशी प्रार्थना निसर्ग देवतांकडे आदिवासी बांधव करत आहेत़ धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्याच्या विविध भागात दोन महिने निलिचारी आणि वागदेव पूजनाचे पारंपरिक कार्यक्रम होतात़वाघदेव, बाबदेव, निलपी या सातपुड्यातील निसर्ग देवता आहेत़ आषाढ आणि श्रावण मासात बहरणारा निसर्ग आदिवासी बांधवांना मुबलक देणं देतो़ या काळात उगवणारा भाजीपाला, धान्य, फळे हे तोडून त्याचा अन्नात वापर करण्यापूर्वी या देवतांचे आवाहन करुन त्यांची परवानगी घेतली जाते़ यावेळी निसर्ग देवतांना विधिवत नैवेद्य दाखवून गावात सुदृढ आरोग्य, सुखसमृद्धी, शांतता आणि एकता अबाधित रहावी असे साकडे घालण्यात येते़ यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावाच्या वेशीवर असलेल्या निसर्ग देवतांचे आवाहन करताना कोरोनमुक्त विश्व व्हावे अशी प्रार्थनाही करण्यात येत आहे़ धडगांव तालुक्यातील चोंदवाडे खुर्द येथे या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला आहे़ यानंतर गावोगावी हे पूजन होत आहे़ निल म्हणजे हिरवे अर्थात भाजीपाल्याचे पूजन होय़ घरातील ज्येष्ठ व्यक्तीने निसर्गाच्या कृपेने उगवलेल्या भाजीपाल्याचे पूजन केल्याशिवाय त्याचे सेवन न करणे असा नियम असल्याने निलिपी पूजनाला महत्त्व आहे़ गावातील पुजारांच्या मार्गदर्शनाने हा उपक्रम होत आहे़ यात वागदेवाचेही पूजन होत असून वाघाने पाळीव गुरांवर सदा कृपादृष्टी ठेवावी असे साकडे घातले जात आहेत़आषाढ आणि श्रावण या काळात सातपुड्यात मोठ्या प्रमाणावर हिरवा भाजीपाला उगवतो़ यात प्रामुख्याने वनभाज्यांचा समावेश असतो़ केवळ वनभाज्याच नव्हे तर विविध कामांसाठी तोडण्यात येणाऱ्या सागाच्या पानांना तोडण्याचीही परवानगीही या देवतांकडून पूजेच्या माध्यमातून करण्यात येतो़ सातपुड्यात दरवर्षी होणाºया या उपक्रमात शेकडोंच्या संख्येने नागरिक सहभागी होतात़ यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे उत्सव केवळ घरगुती म्हणून साजरे होत आहेत़ गावातील ज्येष्ठ नागरिक पुजारांच्या सोबत जावून हे पूजन करत आहेत़
कोरोनामुक्तीसाठी सातपुड्यात पारंपरिक निसर्ग देवतांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 13:00 IST