लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : गेल्या आठ महिन्यांपासून मानधन थकल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवकांनी काम बंद आंदोलन केल्यामुळे ग्रामपंचायत स्तरावरील रोजगार हमीची कामेदेखील ठप्प झाली आहे. मजुरांपुढेही रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्र शासनाच्या रोजगार हमी योजनेतील प्रशासनाने या प्रकरणी गंभीर दखल घेऊन तातडीने थकीत मानधन द्यावे, अशी मागणी सेवकांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी सोमवारी रोजगार सेवकांनी जिल्हा प्रशासनाची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची अपेक्षा व्यक्त केली.केंद्रशासनाकडून स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी महात्मा गांधी रोजगार योजना राबविली जात आहे. या योजनेतून जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमार्फत कामे सुरू करण्यात आली आहे. ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर ग्रामरोजगार सेवकांची नियुक्ती संबंधीत ग्रामपंचायतमार्फत करण्यात आली आहे. केंद्रशासनाकडून कामाच्या स्वरूपात संबंधीत ग्रामरोजगार सेवकास मानधन दिले जात असते. नंदुरबार जिल्ह्यात साधारण 525 ग्रामरोजगार सेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सेवकांमार्फत रोजगार हमी योजनेवरील मजुरांचे रोजची हजेरी मस्टर भरणे, तालुका मुख्यालयी जावून मस्टर जमा करणे, एम बी रेकॉर्ड अद्यावत ठेवणे, जॉब कार्ड तयार करणे आदी कामे केली जातात. साहजिकच शासनाची योजना प्रभावी प्रमाणे राबविण्याचे काम हे रोजगार सेवक करीत असतात. तथापि त्यांचे मानधन गेल्या आठ महिन्यांपासून थकले आहे. त्यांना जानेवारी महिन्यापासून मानधन देण्यात आलेले नाही. मानधनाअभावी त्यांच्यावर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे. मानधनासाठी त्यांनी तालुका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. परंतु वरून उपलब्ध झाले नसल्याचे मोघम उत्तर दिले जात आहे. मानधनासाठी वैतागलेल्या या रोजगार सेवकांनी आता काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात रोजगार हमीची कामे ठप्प झाली आहेत. परिणामी मजुरांपुढे ही रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. वास्तविक रोजगार हमी योजनांसाठी ग्रामरोजगार सेवक शासन आणि मजूर यांचा दुवा ठरत आहे, असे असतांना त्यांचे मानधन थकवून प्रशासन त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष करीत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान, आपल्या थकीत मानधनासाठी सोमवारी जिल्हा प्रशासनाची भेट घेवून याबाबत तातडीने मार्ग काढावा अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष रुपसिंग चौधरी, उपाध्यक्ष सुभाष पाडवी, सचिव नवनाथ ठाकरे, आकाश नाईक, खुशाल पारा, सखाराम राऊत, महेश वळवी, गोकूळदास गावीत, गणेश सूर्यवंशी, कैलास बिरारे, कृष्णा ठाकरे, मणिलाल पवार, अजय भिल, विश्वास वळवी, आनंद वळवी यांनी दिला आहे.
ग्रा.पं.स्तरावरील रोहयोची कामे ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 12:13 IST