ब्राह्मणपुरी : गेल्या दोन वर्षांपासून दराफाटा ते सुसरी धरण लगत असलेल्या आंतरराज्य मार्गाचे काम अगदी कासवगतीने चालू आहे. या महामार्गावर जागोजागी अर्धवट स्वरूपात काम करण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाश्यांना या कामाचा प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या अर्धवट कामामुळे आतापर्यंत अनेक अपघात झाले असून, अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर कित्येक जण अपंग झाले आहेत. या वेळी कंत्राटदाराचा एवढा हलगर्जीपणा आहे की, या महामार्गावर काम करत असताना कुठल्याही प्रकारचे बोर्ड, सूचना फलक न लावल्यामुळे वाहनधारकांना खूप अडचणीचे झाले आहे.
रात्रीच्या वेळेस या महामार्गावर वाहन चालवताना खूप त्रास होत आहे. वाहनचालक जीवमुठीत घेऊन या रस्त्यावर वाहने चालवत आहेत. या रस्त्याने जायचे म्हणजे राम भरोसे म्हणावे लागेल.
खेतियाकडून जाणाऱ्या चांदसैली गावापुढे दोन वर्षांपासून उकरून ठेवलेले रस्ते अद्यापही अर्धवटच आहेत. ही अपूर्ण कामे स्थानिक लोकांना खूप धोक्याची व त्रासदायक ठरत आहेत. अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी कसल्याही प्रकारचे गांभीर्य घेतले जात नाही. तसेच हे काम पूर्ण करण्यास तयार होत नाहीत. पावसाळा चालू होऊन एक महिना झाला आहे. पाऊस पडल्यानंतर दरा फाट्यानजीक अपूर्ण रस्त्याच्या कामामुळे गाडी स्लीप होण्याची शक्यता जास्त असते. या त्रासाला कंटाळून लोक जीवमुठीत घेऊन प्रवास करत आहेत. हा रस्ता म्हणजे जणूकाही मृत्यूचा सापळाच ठरू पहात आहे, असे म्हणायला काही हरकत नाही.
रस्त्यावर पडले फूटभर खड्डे
खेतियाकडून शहादाकडे जाणाऱ्या मार्गावरील चांदसैली गावापुढे सुसरी धरण लागतच्या रस्त्यावर सुमारे एक ते दीड फुटाचे मोठं मोठे खड्डे पडले आहे. यामुळे खेतियाकडून शहादाकडे जाणाऱ्या जीप चालकाला खड्ड्यांचा अंदाज न आल्याने सुमारे ५० ते ६० फूट लांब जीप फेकली गेली. त्यात सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी जीपचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. असे लहान-मोठे अपघात नित्याचेच झाले असून, कासव गतीने सुरू असलेल्या कामाला गती देण्याची मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे. हा रस्ता तयार होत नसेल तर खड्डे तरी बुजवा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
स्त्यालगत लावलेली झाडे किती जगवली?
या महामार्गाचे काम करत असताना रस्त्यालगत असलेली हजारो झाडे तोडण्यात आली आहेत. तसेच संबंधित विभागाकडून या रस्त्याच्या कडेने झाडे लावण्यात आली. पण ती किती जगवली हा प्रश्न आहे.
एकही झाड जगले नाही
पाणी नाही दिले, म्हणून झाडे जळून गेली. या कामामध्ये प्रशासनाने लक्ष घालून लावलेल्या झाडांची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.