शहादा शहरातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते डोंगरगाव चौफुलीपर्यंत रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्याच्या दुतर्फा गटार बांधकामही सुरू आहे. रस्ता रुंदीकरण सात मीटर तर दोन्ही बाजूंनी गटार प्रत्येकी तीन मीटर रुंदीची आहे. ही कामे युद्धपातळीवर सुरू असली तरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते हॉटेल पटेल रेसिडेन्सीपर्यंत रस्त्याचे काम अरुंद होत असल्याने भविष्यात रहदारीसाठी धोक्याचे ठरण्याची श्यक्यता आहे. कारण रस्त्याच्या एका बाजूला लागून शहादा बसस्थानकाने त्यांच्या जागेवर अतिक्रमण होऊ नये म्हणून लांब भिंत बांधली आहे तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पाटचारी आहे. त्यातच काँक्रिटीकरण होत असलेल्या या रस्त्याची रुंदी फक्त सात मीटर असल्याने सुसाट रहदारी असलेल्या या रस्त्यावर भविष्यात अपघाताची तसेच गटार बांधकाम करून शिल्लक राहणाऱ्या जागेवर अतिक्रमणे होण्याची शक्यता असल्याने रस्त्याचे रुंदीकरण वाढवावे यासाठी नागरिकांनी शहादा शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांजवळ कैफियत मांडली होती. या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र जमदाळे, शहराध्यक्ष विनोद जैन, युवा मोर्चाध्यक्ष राजीव देसाई, हितेंद्र वर्मा, वैभव सोनार, जॅकी शिकलीकर, तेजस सोनार, धनंजय लोहार यांच्या शिष्टमंडळाने रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीचे अभियंता जगताप व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता पगारे यांना काम सुरू असलेल्या जागेवर बोलवून रस्ता रुंदीकरण करुन त्यासोबत गटारीचे बांधकामही जागेच्या सुरुवातीपासून करावे, अशी मागणी केली. त्यावर दोन्ही विभागाच्या अभियंत्यांनी या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढून मागणी मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
रस्ता रुंदीकरणाचे काम योग्य होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:27 IST