सुसरी नदीचे उगमस्थान सातपुडा पर्वतरांगेतून जवळपास ६० ते ७० किलोमीटर अंतरावर असल्याने नदीला पाण्याचा पूर वेगात येतो. एकेकाळी बाराही महिने सुसरी नदी वाहत असायची. नदीचे पात्रही मोठे असून, सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यांतून वाहणारी सुसरी व सुखनाई नदीचे पात्र सद्य:स्थितीत कोरडे ठणठणीत झाले आहे. या नदीपात्रातून वाळूचा उपसा झाल्यामुळे नदीतील पाणी जमिनीत न मुरता वाहून जाते. त्यामुळे नदी परिसरातील कूपनलिकांची पाण्याची पातळी कमी झाली आहे. अनेक कूपनलिकांची पाणीपातळी खालावत चालली आहे. त्यामुळे नदी परिसरातील गावांमध्येदेखील पाणीटंचाईची समस्या गंभीर होताना दिसून येते. पावसाळा सुरू होऊन महिना लोटला तरीही नदीपात्रात ठणठणाट आहे. येणाऱ्या काही दिवसांत पावसाची हजेरी लागेल या आशेने नदीतील पाणी वाहून जाऊ नये व मोठ्या प्रमाणात पाणी जमिनीत मुरावे यासाठी ब्राह्मणपुरी येथील ग्रामस्थांनी नदी नांगरटीचा उपक्रम हाती घेतला आहे. ब्राह्मणपुरी ते सुलवाडेपर्यंत नांगरटीला सुरुवात करण्यात आली असून, शेतकऱ्यांनी स्वखर्चाने डिझेल व ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले. या ठिकाणी युवराज दत्तात्रय पाटील, दिगबंर पाटील, संदीप पाटील, प्रमोद मुरलीधर पाटील, प्रदीप रतिलाल पाटील, सुनील मुरलीधर पाटील, कैलास दशरथ पाटील, दीपक रघुनाथ पाटील, राजेंद्र रमेश पाटील, गोपाळ पाटील, माधव पाटील, अविनाश पाटील, शशिकांत पाटील, अनिल पाटील, रवींद्र पाटील, आदी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ब्राह्मणपुरी परिसरातील शेतकऱ्यांना पाण्याचे महत्त्व पटवून नदी नांगरटी उपक्रमात सहभागी करून घेतले.
दोन हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार
ब्राह्मणपुरी येथील सुसरी व सुखनाई नदीपात्रात नदी नांगरटीमुळे सुमारे दोन हजार क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली असून, याचा फायदा मोठ्या प्रमाणावर होणार असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली.
ब्राह्मणपुरी येथील सुसरी व सुखनाई नदीपात्रात शेतकऱ्यांच्या मदतीने स्वखर्चाने नदी नांगरटी करण्याचा निर्णय घेऊन नदी नांगरटी करण्यात येत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी पातळीत वाढ होऊन शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.
- युवराज दत्तात्रय पाटील, ब्राह्मणपुरी, ता. शहादा