यावेळी तहसीलदार रामजी राठोड, गटविकास अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी स्वप्नील मालखेडे, माजी सभापती पिरेसिंग पाडवी, सरपंच शर्मिला वसावे, उपसरपंच मंगलाबाई पाडवी, सामाजिक कार्यकर्ते कालूबा पाडवी, डॉ. कुलदीप ठाकरे, युनिसेफ तालुका समन्वयक जितेंद्र वळवी आदी
उपस्थित होते.
शिबिराच्या ठिकाणी नागरिकांना आणण्यासाठी स्कूलबस आणि खासगी वाहनांचा उपयोग करण्यात आला. लसीकरणासाठी येणाऱ्यांना बिस्किट देण्यात आले. तसेच दुपारी भोजनाची सोयही करण्यात आली. भगदरी येथे मोबाईल नेटवर्क नसल्याने सात किलोमीटर अंतरावर असलेल्या बिजरीगव्हाण येथे ऑनलाइन नोंदणी करण्यात येत होती. मंडपात आधार कार्ड तपासून नोंदणी केल्यानंतर संबंधित पत्र व्यक्तींची माहिती दुताकरवी ऑनलाईन नोंदणीसाठी पाठविण्यात येत होती.
शिबिराच्या ठिकाणी नाव नोंदणी, नाव पडताळणी, लसीकरण पूर्व आरोग्य तपासणी, लसीकरण, निरीक्षण आणि अतिदक्षता आदी विविध कक्ष तयार करण्यात आले होते. प्रत्येक कक्षासाठी स्वतंत्र कर्मचारी आणि स्वयंसेवक नेमण्यात आले होते. शिबिर आयोजनात प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, समुदाय आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक व कर्मचारी, आशा कार्यकर्ती, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, परिचर, वाहन चालक, युनिसेफ प्रतिनिधी आणि जिल्हा समुपदेशक यांचे सहकार्य मिळाले. प्रारंभी जितेंद्र वळवी यांनी लसीकरणाबाबत नागरिकांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी आवश्यक माहिती दिली. माजी सभापती पाडवी यांनी आणि ग्रामपंचायतीने विशेष पुढाकार घेऊन नागरिकांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले.
काही दिवसांपूर्वी काठी येथे झालेल्या शिबिरात ८५ वर्षांचे जालमा रोकड्या वळवी यांच्या कुटुंबीयांनी लस घेण्यास विरोध दर्शवला होता. आज वळवी यांनी स्वतः लांब अंतर चालत येऊन लस घेतली. त्यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला.
भगदरी गावाचे २४ पाडे असून, या पाड्यांमध्ये व परिसरातील गावांमध्ये बैठका घेऊन जनजागृती करण्यात आली होती. घराघरात लोकांना लसीचे फायदे सांगून त्यांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न झाला. त्यामुळेच लसीकरण शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
- रामजी राठोड, प्रभारी तहसीलदार, अक्कलकुवा