नंदुरबार : यंदाचे रक्षाबंधन एसटीसाठी लाभदायक ठरले आहे. कोरोनामुळे बंद पडलेली एसटी पुन्हा सुरू झाल्यानंतरही प्रवाशांअभावी उत्पन्न घटले होते. परंतु गेल्या शनिवारपासून हे चित्र पालटण्यास सुरुवात झाली असून, गत तीन दिवसात एसटीच्या नंदुरबार आगारातून ५०० च्या जवळपास बसफेऱ्या सुरू झाल्या आहेत.
आगारातून सर्वच ठिकाणी बसेस सुरू झाल्या असल्याचे सांगण्यात आले आहेत. पुणे व मुंबई तसेच पंढरपूर या बसला प्रवाशांचा प्रतिसाद देण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. धुळे, नाशिक मार्गावरच्या बसेसमध्ये सध्या सर्वाधिक गर्दी असल्याचे चित्रही दिसून येत आहे. नंदुरबार आगारातून बसेस सुरळीत सुरू झाल्याने यंदा रक्षाबंधनासाठी माहेरी जाणाऱ्या सर्वच बहिणींना दिलासा मिळाला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीट तेवढेच प्रवासी बसवले जात आहेत.
प्रवाशांची गर्दी
कोरोनामुळे गत दीड वर्षापासून प्रवास टाळणाऱ्या महिलांनी माहेरी जाण्यासाठी एसटीचा आधार घेतला. यातून रविवारी सकाळी सर्व बसेसमध्ये गर्दी दिसून आली.
धुळे, शिरपूर, शिंदखेडा, सुरत, चोपडा, नाशिक मार्गावर धावणाऱ्या बसेसमध्ये महिला प्रवाशांची संख्या मोठी होती.
नंदुरबार आगाराने रविवारी दिवसभरात ४७४ बसफेऱ्या पूर्ण केल्याची माहिती देण्यात आली. संपूर्ण आठवडाभर रक्षाबंधनाचा हा इफेक्ट दिसून येणार आहे.