नंदुरबार : जिल्हा आरोग्य विभागातील मोबाइल मेडिकल युनिट गैरव्यवहार प्रकरणी धडगाव, तळोदा आणि अक्कलकुव्याच्या तत्कालीन तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव दोन वर्षांपासून शासनाकडे पडून आहे. आरोग्य संचालक यांना जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या प्रस्तावावर कार्यवाही करण्यात येत नसल्याने या प्रकरणात आरोग्य विभागाच्या तिघांना पाठीशी घालत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
दुर्गम आदिवासी भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचावी यासाठी शासनाने दुर्गम भागातील धडगाव, अक्कलकुवा आणि तळोदा या तीन तालुक्यांसाठी मोबाइल मेडिकल युनिट ही सेवा दिली होती. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चालणाऱ्या या युनिटमध्ये संपूर्णपणे बोगस कारभार चालत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. दरम्यान, याबाबत तक्रारी करण्यात आल्यानंतर जिल्हास्तरीय समितीने चाैकशी करून अहवाल जिल्हा परिषदेकडे दिला होता. या अहवालानंतर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आर. बी. सोमवंशी यांनी तिघांच्या निलंबनाचा प्रस्ताव आरोग्य संचालकांकडे पाठवला होता. परंतु या सर्व कार्यवाहीला दोन वर्षे उलटूनही आरोग्य संचालकांकडून कोणत्याही प्रकारचे उत्तर देण्यात आलेले नसल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. एन. डी. बोडके यांना संपर्क केला असता, २०१६-१७ मध्ये मोबाइल मेडिकल युनिटमध्ये गैरव्यवहाराचा ठपका ठेवलेले अक्कलकुवा, तळोदा आणि धडगावचे तत्कालीन तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव आरोग्य संचालकांना दोन वर्षांपूर्वी दिला आहे. वेळोवेळी तिघांचे खुलासे व इतर सर्व कागदपत्रे, अहवालही पाठवला असल्याची माहिती त्यांनी दिली.