नंदुरबार : खरीप २०१८ मध्ये दुष्काळ घोषित झालेल्या जिल्ह्यातील चार तालुक्यातील बागायतदार शेतकरी दुष्काळी अनुदानाची मागणी करत आहेत़ यावर प्रशासनाने शासनाकडे पत्रव्यवहार केला असून त्यावर सकारात्मक उत्तर मिळण्याची शक्यता कमी असल्याची माहिती आहे़ यातून बागायतदार शेतकरी दुष्काळी अनुदानापासून वंचित राहणार आहेत़राज्यशासनाने नंदुरबार, नवापूर, शहादा आणि तळोदा तालुक्यासह अक्कलकुवा तालुक्यातील दोन मंडळात दुष्काळ जाहिर केल्यानंतर १ लाख ४७ हजार शेतकरी दुष्काळ अनुदानासाठी पात्र ठरत होते़ यातील दोन हेक्टर क्षेत्र असलेल्या १ लाख ३१ हजार शेतकऱ्यांना खातेनिहाय रक्कम मिळाली आहे़ परंतू बागायतदार शेतकरी अनुदानासाठी पाठपुरावात करत आहेत़ त्यांच्या पाठपुराव्याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने शासनाला पत्र पाठवून मदत देण्याबाबत विचारणा केली होती़ परंतू शासनाने याबाबत उत्तर देण्यास टाळले असून निधीअभावी त्यांना अनुदान मिळणे शक्य नसल्याचे सांगण्यात येत आहे़ यातही ‘बागायती क्षेत्रास मदत’ असा उल्लेख शासनाच्या अध्यादेशात नसल्याने बागायतदार दुष्काळी अनुदानापासून वंचित राहणार असल्याचे महसूली सूत्रांचे म्हणणे आहे़ एकीकडे बागायतदार शेतकºयांचा भ्रमनिरास होत असताना दुसरीकडे दुष्काळी म्हणून घोषित झालेल्या धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील किमान २० हजार शेतकºयांना मदतीची प्रतिक्षा आहे़ दोन्ही तालुक्यांमधील सर्व गावांची पैसेवारी ही ५० पैश्यांच्या आत असल्याने शेतकरी अनुदानासाठी सरसकट पात्र ठरत असतानाही त्यांना अद्याप मदत मिळालेली नाही़
बागायतदारांची समस्या सुटण्याची चिन्हे दिसेनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 12:23 IST