लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : कार्तिकी पौर्णिमेनिमित्त प्रकाशा, ता.शहादा येथील कार्तिक स्वामी मंदिर हे वर्षातून एकदाच खुले होत असल्याने 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेला मंदिराचे दरवाजे खुले होणार असून, 12 रोजी रात्री 12 वाजेर्पयत भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले राहणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त भाविकांनी कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नियोजन मंडळातर्फे करण्यात आले आहे.दक्षिण काशी असलेल्या प्रकाशा येथे महादेवांच्या विविध मंदिरांसह कार्तिक स्वामींचे पुरातन मंदिर आहे. या मंदिराच्या मागे प्रकाशा बॅरेज असून, या बॅरेजच्या पात्रात निर्माण झालेल्या पाण्याच्या फुगवटय़ामुळे प्रचंड जलसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे हा परिसर अधिकच खुलला आहे. आजूबाजूला ऋणमुक्तेश्वर महादेव, कपिलेश्वर महादेव, मनीषापुरी माता, गणपती मंदिर, खंडेराव महाराज आदी मंदिरे आहेत.याठिकाणी कार्तिकी पौर्णिमेनिमित्त यात्रोत्सव साजरा केला जातो. कार्तिक स्वामी नवसाला पावतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेशातील भाविक मोठय़ा संख्येने दर्शनासाठी येत असतात. कार्तिकी पौर्णिमेनिमित्त गणपती पूजन, नवग्रह, मातृका पूजन, देवी देवतांचे आवाहनासह होमहवन केले जाणार आहे. या वेळी पुजचे मानकरी असलेले कार्तिक स्वामी भक्तमंडळाचे अध्यक्ष दिलीप भिल, ललिता भिल यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात येणार आहे.तसेच 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.03 मिनिटांनी पौर्णिमा संपत आहे. त्यामुळे येथे येणा:या भाविकांची गर्दी लक्षात घेता कार्तिक स्वामी भक्त मंडळाच्या पदाधिका:यांनी रात्री 12 र्पयत मंदिर खुले ठेवले जाणार असल्याची माहिती दिली.यात्रोत्सवानिमित्त ग्रामपंचात प्रशासनातर्फे नियोजन करण्यात येत असून, रस्ते, पथदिवे, पिण्याच्या पाण्याच्या सुविधेसह स्वच्छतेचे कामही केले जात आहे. या वेळी मंदिरास रंगरंगोटीसह विद्युत रोषणाई, मंडप व्यवस्था आदी कामे करण्यात येत असल्याचे अध्यक्ष दिलीप भिल, राजेंद्र मिस्तरी, अरुण ठाकरे, रमेश माळीच, पिंटू भिल, कैलास माळीच, पुन्या पवार, अंबालाल माळीच, शत्रूघ्न माळी आदींनी सांगितले.यात्रोत्सवासाठी मंदिर समितीसह ग्रामपंचाय व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.
कार्तिक स्वामी यात्रोत्सवाची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 13:12 IST