नंदुरबार : १५ ते १७ एप्रिल दरम्यान नंदुरबार, धुळे तसेच नाशिक जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे़ ‘आयएमडी’तर्फे संकेतस्थळावर अंदाज व्यक्त करण्यात आला आहे़सध्या पुर्व तसेच पश्चिमेकडून वाऱ्यांचा प्रवाह वाहत आहे़ त्याच प्रमाणे भारताच्या पश्चिमेकडून एक ट्रफ रेषा पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातून जात दक्षिणेकडे गेली आहे़ यातून कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे़ या सर्व वातावरणीय बदलांमुळे राज्यात विविध ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे़ सध्या राज्यात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आदी ठिकाणी पावसाने हजेरी लावलेली आहे़ आता या ट्रफ रेषेत उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार व धुळे जिल्हादेखील समाविष्ठ झाला आहे़ त्यामुळे १५ ते १७ एप्रिल दरम्यान, जिल्ह्यात तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे़ दरम्यान, नंदुरबरात शनिवारी तब्बल ४२ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे़ तर किमान तापमान २७ अंशावर होते़ हवेच्या दाबाचा वेगाने घट होत असल्याने साहजिकच कमाल व किमान तापमानात मोठी वाढ झालेली आहे़ दुपारच्या वेळी वाढत्या तापमानामुळे नंदुरबारात अघोषित संचारबंदी सारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे़ त्यामुळे साहजिकच ऐरवी गजबजलेले रस्ते दुपारी उन्हाच्या प्रकोपामुळे ओस पडलेले दिसून येत आहेत़ उकाड्याचा सामना करण्यासाठी नागरिकांकडून पंखे, कुलर, एसी आदींचा सहारा घेतला जात आहे़ वाढत्या उष्णतेमुळे सर्वसामान्यांच्या दैनंदिन जिवनावर याचा परिणाम झालेला दिसून येत आहे़ पुढील आठवड्यापर्यंत तापमानात अजून एक ते दोन अंशाने वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलेला आहे़
नंदुरबार व धुळ्यात तुरळक पावसाचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 20:20 IST