उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या विद्यमाने महाराष्ट्रातील आयएएस विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण वाढावे म्हणून विभागाच्या वतीने प्री- आयएएस ट्रेनिंग हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची जाणीव व्हावी व आयएएसच्या स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्याची मानसिकता निर्माण व्हावी म्हणून प्री-आयएएस ट्रेनिंग हा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. या उपक्रमासाठी मार्गदर्शन वर्ग महाविद्यालयात झाला. प्री-आयएएस ट्रेनिंगसाठी महाराष्ट्रातील गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांची निवड करून शासनाच्या वतीने त्यांना वर्षभर ट्रेनिंग दिले जाईल. हे ट्रेनिंग मोफत असेल. त्यासाठी वसतिगृहाचीही मोफत सोय असेल तसेच निर्वाहभत्ताही विद्यार्थ्याला दिला जाईल. या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे मार्गदर्शन महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा केंद्राचे समन्वयक प्रा.एस. एस. दुथडे यांनी केले. मार्गदर्शन वर्गाच्या सुरुवातीला प्राचार्य डॉ. एस.पी. पाटील व इतर प्राध्यापकांनी सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर प्राचार्य एस.पी. पाटील यांनी या मार्गदर्शन वर्गाचा हेतू विद्यार्थ्यांसमोर मांडला. प्रा.एस. एस. दुथडे यांनी आपल्या मार्गदर्शनात ट्रेनिंगसाठी ऑनलाइन एन्ट्रन्स टेस्टचे स्वरूप, ट्रेनिंगचे स्वरूप, ट्रेनिंगसाठी असलेला अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप, ट्रेनिंगची प्रवेशप्रक्रिया, कालखंड, पात्रता, मॉकटेस्ट यासंदर्भात मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी शंका निरसनाचे सत्र ठेवण्यात आले. यात विद्यार्थ्यांनी या ट्रेनिंगसंदर्भात विविध शंका विचारून शंकांचे समाधान झाले. या मार्गदर्शन वर्गामुळे विद्यार्थ्यांच्या मनात प्री-आयएएस ट्रेनिंगविषयी सकारात्मक भावना निर्माण झाली. तसेच स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात आत्मविश्वास निर्माण झाला. मास्कचा वापर, शारीरिक अंतर व कोरोनासंदर्भातील इतर सर्व नियमांचे पालन करून मार्गदर्शन वर्गाचे आयोजन केले होते. सूत्रसंचलन प्रा.एम.एस. निकुंभे यांनी, तर आभार विद्यार्थिनी निकिता गवळे यांनी मानले.
बामखेडा कला महाविद्यालयात प्री-आयएएस ट्रेनिंग मार्गदर्शन वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:32 IST