शिरपूर : शहरातील काशिरामनगरात घरमालकाच्या घरातून भाडेकरी महिलेनेच नऊ लाख 70 हजारांची चोरी केल्याचे प्रकरण मंगळवारी सकाळी उघडकीस आले. आऱसी़ पटेल फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ़संजय सुराणा यांच्याकडे ही घटना घडली. पोलिसांनी अवघ्या काही तासातच ती चोरी करणा:या भाडेकरू महिलेला सर्व रकमेसह ताब्यात घेतले आहे. प्राचार्य सुराणा हे मंगळवारी सकाळी नऊ वाजता पत्नी वैशालीसह जैन स्थानकात गुरू महाराजांच्या दर्शनासाठी गेले होते. तत्पूर्वी त्यांनी बँकेत भरणा करण्यासाठी आणलेली नऊ लाख 70 हजार रुपयांची रक्कम घरातील कपाटात ठेवली होती. घरी त्यांची वृद्ध आई व मुलगा होता आणि घराचा मुख्य दरवाजा अर्धवट उघडा होता़ दर्शन करून परतल्यावर बँकेत भरणा करण्यासाठी कपाटातून पैसे घेण्यासाठी ते गेले असता कपाटात पैशांची थैली नसल्याचे पाहून त्यांचे धाबेच दणाणले आणि त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी, सपोनि ए़ए़ पटेल, पीएसआय विजय आटोळे, जी़ज़े महाले, हवालदार रमेश बन्सी, मदन सोनवणे, श्रीकांत पाटील, रफिक मुल्ला, सुनीता पवार, स्वाती शहा, अखिल पठाण, विश्वास पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन या प्रकरणाचा काही तासातच छडा लावला.