नंदुरबार : अक्कलकुवा ग्रामपंचायत गैरव्यवहारप्रकरणी सुरू असलेल्या चाैकशीत सोमवारी प्रशासकीय कारवाईला सुरुवात होण्याची शक्यता आहे. लेखापरीक्षकांकडून सध्या परीक्षण सुरू असल्याचे सांगण्यात आले असले तरी कागदपत्रे अपूर्ण असल्याने तत्कालीन ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी, प्रशासक यांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. या नोटिसांची मुदत सोमवारी संपणार आहे.
अक्कलकुवा ग्रामपंचायत गैरव्यवहारप्रकरणी सुरू असलेल्या चाैकशीतून दोषी असलेल्यांवर कारवाई व्हावी यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून कागदपत्रे तपासली जात आहेत. ग्रामविकास विभागाने दिलेल्या आदेशांनुसार या २०१६ ते २०२० या काळातील लेखापरीक्षण करण्याचे निश्चित करण्यात आले होते. दरम्यान, लेखापरीक्षण सुरू होण्याच्या एक दिवस आधीच ग्रामपंचायतीतील दप्तर चोरीला गेल्याचे समोर आले होते परंतु चोरट्यांनी २०२० चे दप्तर चोरून नेल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान, शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी पोलिसांचा अहवालही गरजेचे असल्याचे सांगून जिल्हा परिषदेकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांच्या आधारे कार्यवाही पुढे सुरू ठेवणार असल्याचे सांगितले होते. तत्पूर्वी ग्रामविकास विभागाने सात दिवसांच्या आत तत्कालीन अधिकाऱ्यांनी दप्तर उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. सोमवारी ही मुदत पूर्ण होत असल्याने पुढे काय कारवाई होणार, याकडे लक्ष लागून आहे.
एकूण ४ कोटी २० लाखांपेक्षा अधिकचा हा गैरव्यवहार असून लेखापरीक्षण झाल्यानंतर हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.