सारंगखेडा गावाजवळील तापी नदीवरील पुलाच्या आजूबाजूला पिचिंग केलेला दगडांचा भराव खचून गेल्याने मोठा अनर्थ होऊन अपघात होण्याची शक्यता आहे. या पुलावरून वाहन चालविणे धोक्याचे झाले असून रस्त्यासह पुलाची दुरुस्ती व्हावी यासाठी अनेक वेळा मागणी करण्यात आली. खुद्द तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनीही या दुरुस्तीबाबत संबंधित विभागाला सूचना दिली होती. मात्र कुंभकर्णी झोपेत असलेल्या संबंधित विभागाने मात्र अद्यापही दुरुस्तीचे मुहूर्त काढले नाहीत. या पुलावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे टाळण्याच्या प्रयत्नात अपघातही होत आहेत. सध्या पाऊस सुरू असल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साचते. खड्ड्यांमधील पाण्याचा वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने त्यात आदळून वाहनांचे नुकसानही होत आहे. पुलावरून अवजड वाहन गेल्यास पूल अक्षरश: हलतो. पुलाच्या कठड्यांचीही दुरवस्था झाली आहे. पुलावर भविष्यात होणारी दुर्घटना टाळण्यासाठी या पुलाचे चांगल्या दर्जाचे नूतनीकरण करावे किंवा नवीन पूल बांधावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
गणेश मंडळ कार्यकर्त्यांनी वेधले लक्ष
सारंगखेडा येथील पुलाच्या दुरुस्तीबाबत संबंधित विभागाने लक्ष वेधावे यासाठी येथील महाकाल गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून अनोखी जनजागृती करण्यात आली. त्यात या कार्यकर्त्यांनी पुलावर जात खड्ड्यांचे मोजमाप केले. काही खड्ड्यांमध्ये विविध देशांचे नकाशे चित्रमय स्वरूपात दाखविण्यात आले. यामुळे तरी संबंधित विभाग या पुलावरील खड्डे बुजवून दुरुस्ती करेल, अशी अपेक्षा मंडळाचे कार्यकर्ते व वाहनधारकांकडून व्यक्त होत आहे. या गणेश मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुकही होत आहे.