नंदुरबार : अक्कलकुवा ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या चोरीचा तपास अहवालही गैरव्यवहार प्रकरणातील चाैकशीत कामी येणार असल्याची माहिती समोर आली आहे. तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात जिल्हा परिषदेचे अधिकारी असून गैरव्यवहार प्रकरणी येत्या काही दिवसांत मोठी कार्यवाही होण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांना संपर्क केला असता, अक्कलकुवा ग्रामपंचायतीत झालेली चाेरीची एफआयआर झाली आहे. हा दुवाही कामी येणार आहे. जिल्हा परिषदेकडे सर्व सत्यप्रती तसेच दप्तराच्या झेराॅक्स आहेत. यामुळे कार्यवाहीत सध्या तरी अडचणी येत नाहीत. परंतु ग्रामपंचायतीत झालेल्या चोरीचा तपास पूर्ण होणेही गरजेचे आहे. लेखापरीक्षणाची कार्यवाही सुरू असल्याने येत्या काळात काय निष्पन्न होते, त्याकडे प्रशासनाचे लक्ष असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, ग्रामपंचायतीतील चोरीला १५ दिवसांपेक्षा अधिकचा कालावधी उलटूनही चोरटे सापडले नसल्याने अक्कलकुवा शहरात चर्चांना उधाण आले आहे. ग्रामपंचायतीतून दप्तर चोरीनंतर उशिराने फिर्याद देण्यात आली होती. यानंतरही चोरट्यांचा अद्याप तपास लागलेला नाही. तब्बल चार कोटी १८ लाख रुपयांच्या या गैरव्यवहार प्रकरणी दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी दिवसेंदिवस जोर धरत आहे. हे प्रकरण लांबत असल्याने नाराजीही व्यक्त होत आहे.