नंदुरबार - पोलीस दूरक्षेत्रावर चाैकशीसाठी बोलावलेल्या युवकांमध्ये बाचाबाची होऊन हाणामारी झाल्याची घटना गुरुवारी खापर (ता. अक्कलकुवा) येथे घडली. याप्रकरणी पाचजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खापर पोलीस दूरक्षेत्रात गुरुवारी लक्ष्मीकांत मनोज मराठे, तुषार लक्ष्मीकांत मराठे, गणेश उर्फ शुभम लक्ष्मीकांत मराठे (तिघे रा. खापर), चंद्रकांत ऊर्फ अभिषेक खांडवे व जय चंद्रकांत खांडवे (दोन्ही रा. सेलंबा, ता. सागबारा, जिल्हा नर्मदा (गुजरात)) यांना चाैकशीसाठी बोलावण्यात आले होते. पोलीस अंमलदार पाचहीजणांची चाैकशी करत असताना त्यांच्यातच बाचाबाची सुरु झाली. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी आवर घालूनही पाचहीजण एकमेकांवर धावून जात हाणामारी करत होते. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल नीलेश वसावे यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पाचही संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस कॉन्स्टेबल राणीलाल भोये करत आहेत.
पोलीस दूरक्षेत्रामध्ये मारामारी करणाऱ्यांविरोधात गु्न्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:36 IST