लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करुन जिल्ह्यात प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील जलतरण तलाव, योग प्रशिक्षण केंद्र, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स आणि काही इनडोर खेळ सुरु करण्यास जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी परवानगी दिली आहे. ५ नोव्हेंबरपासून या सर्वांना परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी जलतरण तलावांना परवानगी देण्यात आली आहे. यासाठी क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या मार्गदर्शक सूचना व निर्देश लागू असतील. प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर असलेल्या योगा संस्थांना पुन:श्च सुरु करण्यासाठीही परवानगी देण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन हे कामकाज होईल. दरम्यान बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॅश, इनडोर शूटिंग सारख्या इनडोर क्रीडा प्रकारांनाही शारीरिक अंतर आणि सॅनिटेशनसंबंधी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर ५ नोव्हेंबर पासून मुभा देण्यात आली आहे. चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स, ड्रामा थिएटर्स यांनाही ५० टक्के आसनव्यवस्था पालनाच्या अटीवर प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर पुन्हा सुरू करण्यासाठीही अनुमती देण्यात आली आहे. चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्समध्ये कोणत्याही खाद्य पदार्थांना परवानगी नसेल. या सर्व ठिकाणी मास्कचा वापर, सामाजिक अंतर राखणे यासारख्या कोविड-१९ प्रतिबंधक मार्गदर्शक निर्देशांचे पालन करणे आवश्यक असेल. आदेशाचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याबाबत तपासणी करण्याचे अधिकारी त्या-त्या क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थाना देण्यात येत आहे. हे आदेश संपूर्ण नंदुरबार जिल्ह्याच्या सीमा क्षेत्राकरीता लागू राहील. सदर आदेशाचे कोणत्याही व्यक्ती अथवा संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथ प्रतिबंधक कायदा व कलम 188 नुसार नुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे.या आदेशानंतर नंदुरबार व शहादा येथील मल्टीप्लेक्स येत्या दोन दिवसात सुरू होण्याची शक्यता असून गेल्या १५ दिवसांपासून याठिकाणी तयारी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
मल्टीप्लेक्स व जलतरण तलाव सुरू करण्याची मुभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 12:51 IST