सन २०१६-१७ मध्ये या उपसा जलसिंचन योजना पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी ४२ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली होती. तापी खोरे विकास महामंडळ जळगाव अंतर्गत अधिकाऱ्यांनी यांत्रिकी व विद्युतबाबत दुरुस्ती करण्यात आली होती. ९० टक्के कामे झाली होती. याव्यतिरिक्त चाचणीही घेण्यात येऊन पाणी टाकण्यात आले होते. नंतर मात्र योजनांच्या लाभ क्षेत्रात दुरुस्तीची कामे करताना काही अडचणी आल्याने पुन्हा काम बंद झाले. काही काळ लांबल्याने नवीन दुरुस्तीच्या खर्चाच्या सुमारे ११५ कोटी रुपयांचे सुधारित अंदाजपत्रक शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आले होते. सातपुडा कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, तापी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक, मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता यांचे सहकार्य घेऊन सातत्याने पाठपुरावा केला. शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्न असल्याने प्राधान्य देण्याबाबत आग्रह केला. त्याचे फलित म्हणून २० मे रोजी जलसंपदा विभागाने मान्यता दिली. आता जिल्ह्यातील सर्व २२ उपसा जलसिंचन योजना लवकरच कार्यान्वित होऊन शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल. साधारणत: आठ हजार शेतकऱ्यांना ३५ हजार एकर क्षेत्राच्या सिंचनासाठी लाभ मिळणार आहे. दीपक पाटील यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासह तापी खोरे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांतर्फे आभार व्यक्त केले आहेत.
उपसा योजना कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:28 IST