लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील तापी नदीपात्रात सात वर्षानंतर ‘पतोला’ जातीचा मासा शनिवारी सापडला. हा मासा पाहण्यासाठी गर्दी जमली होती.सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा येथील तापी नदीमध्ये कधी-कधी मोठ्या प्रमाणावर मासे सापडतात. शनिवारी काही कामानिमित्त प्रकाशा बॅरेजचे गेट बंद केल्यानंतर मासेमारी करणाऱ्या आकाश झिंगाभोई यांना ‘पतोला’ जातीचा मासा सापडला. हा मासा यापूर्वी सात वर्षाआधी तापी नदीत आढळला होता. त्याचा सिल्व्हर असून तोंड अतिशय लहान आहे. त्याच्या शरीरात एकच मोठा काटा निघतो. त्याला जास्त खवले राहत नाही. पाठीवर अजगरासारखा रंग व चटपटे आहेत. हा मासा चवदार असल्याने त्याची मागणी जास्त असते. हा मासा एका व्यापाºयाने खरेदी केला असून तो विक्रीसाठी हावडाकडे निघाला आहे. हा मास पाहण्यासाठी मच्छीमारांसह नागरिकांनी गर्दी केली होती.प्रकाशा येथे कटला, सिल्व्हर, निरगल, रहू, डिगार, पडण, कालीताम, पापदा, झिंगे आदी प्रकारचे मासे आढळतात. सध्या प्रकाशा बॅरेजचे चार गेट उघडे असल्याने पाहिजे तशी मासेमारी होत नाही. यावर्षी पावसाळा सुरू झाल्यापासून प्रकाशा बॅरेजचे गेट कमी-जास्त प्रमाणात उघडण्यात येत आहेत. त्यामुळे मच्छीमारांना पाहिजे तसा अद्यापपर्यंत फायदा झालेला नाही. सर्व गेट बंद राहिले तर मासे सापडण्याचे प्रमाण जास्त असते. मात्र हतनूर धरणातून पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने सर्व गेट बंद करता येत नाहीत. मात्र शनिवारी दुपारी दोन तास कामानिमित्त गेट बंद केले होते त्यावेळी हा मासा त्यातून निघाला.
तापी पात्रात आढळला ‘पतोला’ मासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 13:01 IST