लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : नवापूर विधानसभा मतदार संघातील तीन मतदान केंद्र पुर्णत: तर दोन मतदान केंद्रात अंशत: बदल करण्यात आला आहे. निवडणूक पारदर्शक पध्दतीने पार पाडण्यासाठी प्रशासनाने विविध आघाडय़ांवर जय्यत तयारी केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी महेश शेलार यांनी सांगितले, नवापूर तालुक्यासह नंदुरबार तालुक्यातील दोन महसूल मंडळे समाविष्ट आहेत. एकुण 336 मतदान केंद्र आहेत. ही केंद्रे 32 विभागात विभागली गेली आहेत. नवापूर शहरातील तीन मतदान केंद्रांचे स्थळ पुर्णत: बदलण्यात आले आहेत. लाईटबाजार भागातील जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या पडक्या इमारतीतील 181, 183 व 184 क्रमांकाचे तीन मतदान केंद्र पुर्णत: इतरत्र स्थलांतरीत करण्यात आले आहे. त्यापैकी 181 क्रमांकाचे मतदान केंद्र सार्वजनिक गुजराती हायस्कुल मधे तर 183 व 184 क्रमांकाचे मतदान केंद्र जुन्या ग्रामीण रुग्णालय आवारातील गुजराती मुलांच्या शाळेत हलविण्यात आली आहेत. या शिवाय देवलीपाडा येथील 271 क्रमांकाचे मतदान केंद्र जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीतून शेजारच्या नवीन इमारतीत स्थलांतरीत झाले आहे. आष्टे येथील 293 क्रमांकाचे मतदान केंद्र जिल्हा परिषद शाळेत खोली क्रमांक एक मधुन खोली क्रमांक दोन मधे हलविण्यात आले आहे.राजकिय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेऊन निवडणुकीची प्रक्रिया, आदर्श आचार संहितेची माहिती दिली. यंदा निवडणूकीसाठी दोन लाख 87 हजार 614 मतदारांची नोंदणी झाली आहे. मतदार संघाचे आदर्श मतदान केंद्र शहरात 193 क्रमांकाचे असणार आहे तर महिला मतदान केंद्र म्हणून 192 क्रमांकाचे केंद्र निर्धारित करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी महेश शेलार व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुनिता ज:हाड यांनी दिली.
Vidhan Sabha 2019: तीन केंद्रात पुर्णत: तर दोन केंद्रांत अंशत: बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 13:03 IST