नंदुरबार : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान २०२०-२०२१ अंतर्गत अनुदानित बियाण्यांसाठी केवळ साडेचार हजार शेतकरी ऑनलाईन अर्ज सादर करू शकले होते. शासनाने नुकतेच या अर्जांची सोडत काढून अडीच हजार लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ दिल्याचे घोषित केले आहे. खरीप हंगामात अनुदानित बियाण्यांसाठी हे अर्ज मागविण्यात आले होते.
कृषी विभागाने गेल्या महिन्यात केलेल्या बियाण्यांसाठी २ हजार ४०७, प्रात्यक्षिकांसाठी एक हजार ५५४, आंतरपीक प्रात्यक्षिकासाठी २७६, तर बियाणे मिनी किटसाठी ३२१ जणांनी ऑनलाईन अर्ज केल्याचे स्पष्ट केले होते. अंतिम मुदतीत अर्ज देणाऱ्या एकूण चार हजार ५५८ पैकी अडीच हजार शेतकरी सोडतीत नशीबवान ठरले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
अन्नसुरक्षा अभियानअंतर्गत कडधान्य, धान्य व सोयाबीन बियाण्यांसाठी अनुदान देण्यात येणार आहे. प्रतिकिलो ५० रुपयांपर्यंत हे अनुदान दिले जाणार आहे. दरम्यान, या योजनेत समावेश व्हावा यासाठी जिल्ह्यातील इतर शेतकरीही उत्सुक होते. २४ मेपर्यंतची मुदत असलेल्या या योजनेत ऑनलाईन अर्ज न करू शकल्याने समावेश होवू शकला नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, ज्या शेतकऱ्यांचे सोडतीत नाव आले आहे, त्यांना मोबाईलवर शासनाकडून मेसेज देण्यात येणार असल्याची माहिती कळविण्यात आली आहे. लवकरच तालुका स्तरावरून या शेतकऱ्यांना बियाणे वाटपाची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यासाठी तयारीही पूर्ण झाली आहे.
खर्च वाढला
यंदा शेतीचा खर्च दुपटीने वाढला आहे. प्रत्येक ठिकाणी जादा पैसे मोजावे लागत आहेत. यातून शेतकरी संकटात आहे. अनुदानित बियाण्यांच्या योजनेमुळे खर्चावर काहीअंशी नियंत्रण येईल.
- गुलाब मराठे, उमर्दे, ता. नंदुरबार.
पुढे लाभ मिळावा
अनुदानित बियाण्यांचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. शासनाने दरवर्षी शेतकऱ्यांना धान्य व नगदी पिकांचे बियाणे ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
- राकेश महाजन, काकर्दे, ता. नंदुरबार.
योजना समजावून द्या
कृषी विभागाच्या अनेक योजना समोर येत नाहीत. त्यात बियाणे अनुदानासारखी चांगली योजनाही माहीत नाही. सोडत निघून गेल्यावर ही बाब समोर आली आहे. हे दु:खद असे आहे.
-फारुख खाटीक, काकर्दे, ता. नंदुरबार.