लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राष्ट्रीय लोकअदालतीत दाखलपूर्व १,१७० तर प्रलंबीत ८८ प्रकरणे निकाली काढण्यात आली. तब्बल २ कोटी रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली.शनिवारी येथील जिल्हा न्यायालय परिसरात राष्टÑीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील सर्व न्यायालयातील तडजोडक्षम प्रलंबीत फौजदारी, दिवाणी मोटर अपघात दावे प्रकरणे व दाखलपूर्व प्रकरणांचा समावेश करण्यात आला होता. दाखलपूर्वमध्ये वीज, पाणीपट्टी, घरपपट्टी, बँका यांची थकीतबिले व इतर प्रकरणांचा समावेश होता.यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश प्रमोद तरारे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस.टी.मलीये, तदर्थ जिल्हा न्यायाधिश ए.एस.भागवत, दिवाणी न्यायाधिश एल.डी.गायकवाड, न्या.एन.बी.पाटील आदी उपस्थित होते. त्यांनी पॅनेल प्रमुख म्हणून काम पाहिेले. त्यांना मदतीसाठी एम.एन.पठाण, एस.व्ही.गवळी, एस.ए.कुलकर्णी, यु.एच.केदार व एस.के.पाटील, आर.डी.गिरासे यांनी मदतनीस म्हणून काम पाहिले.लोकअदालतीत प्रलंबीत ८८ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यात दिवाणी २९ प्रकरणांमध्ये २० लाख ५४ हजार ६१७ रुपये वसुल करण्यात आले. मोटर अपघाताची १३ प्रकरणामध्ये ६४ लाख २७ हजार रुपये, धनादेश अनादराची ४२ प्रकरणांमध्ये २९ लाख ६२ हजार ६५८ रुपयांची वसुुली करण्यात आली. याशिवाय फौजदारी चार प्रकरणे अशी एकुण ८८ प्रकरणे निकाली काढण्यात आली व एक कोटी १४ लाख ४४ हजार २७५ रुपयांची वसुली करण्यात आली.दाखलपूर्व प्रकरणांमध्ये १,१७० प्रकरणे निकाली निघाली. त्यात बँक वसुलीची ६८ प्रकरणे होती. त्यातून ९० लाख ८३ हजार १३३ रुपयांची वसुली, वीज थकबाकीची ६८ प्रकरणी होती. त्यातून सहा लाख ५२ हजार ६८ तर पाणीपट्टी, घरपट्टी थकबाकीची एक हजार ३४ प्रकरणे निकाली काढली गेली. त्यातून तीन लाख ७९ हजार ९२९ रुपयांची वसुली करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. यावेळी जिल्हा न्यायालय परिसरात जिल्हाभरातून आलेले पक्षकार, त्यांचे नातेवाईक व वकिल मंडळी यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती.