नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घोषित लाॅकडाऊनला शिथिलता देण्यात आली आहे. यातून एक जूनपासून शहरातील इतर व्यवसायही सुरू झाले आहेत. यात मोबाईल खरेदी-विक्री आणि दुरुस्तीची कामेही सुरू झाली आहेत. दोन महिन्यांपासून बंद असलेली दुरुस्तीची दुकाने सुरू झाल्यानंतर याठिकाणी पुन्हा जुन्याच दिवसांसारखी गर्दी होत आहे.
सुमारे दोन महिन्यांपासून बंद असलेली मोबाईलची बाजारपेठही सुरू झाल्याने त्याठिकाणी दुरुस्तीकरिता दिलेले मोबाईल, तसेच दुरुस्तीची कामे करण्यासाठी अनेकजण येत आहेत. यात प्रामुख्याने ग्रामीण भागातील युवकांचा समावेश आहे. शहरातील नगरपालिका चाैक, स्टेशन रोड, सिंधी काॅलनी आणि बसस्टँड परिसरात मोबाईल खरेदी-विक्रीसह दुरुस्तीची दुकाने आहेत. साधारण ३०० च्या जवळपास ही दुकाने आहेत. प्रत्येकाकडे सामान्यपणे जनजीवन असताना १०० पेक्षा अधिक ग्राहक हे दररोज येत होते. कोरोनामुळे ही संख्या कमी होईल अशी अपेक्षा होती; परंतु दुकानांमधील गर्दीमुळे संसर्ग वाढण्याचा धोका आहे. हा धोका ओळखून संबधित दुकानदार ग्राहकांना सूचना करून उपाययोजना कराव्यात, अशा सूचना करत आहेत; परंतु त्याकडे ग्राहक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, दुकानमालक मास्क व सॅनिटायझर्सचा वापर करण्यावर अधिक भर देत असल्याचे दुसऱ्या अनलाॅकनंतर समोर आले आहे.
ही आहेत कारणे
प्रामुख्याने मोबाईलची तूट फूट होऊन दुरुस्तीची कामे निघतात. यात डिस्प्ले दुुरुस्तीची सर्वाधिक कामे आहेत. या कामासाठी वेळ लागतो.
मोबाईलची बाॅडी नव्याने टाकणे, माेबाईल पाण्यात पडून खराब झाल्याने दुरुस्तीसाठी येतात.
स्मार्ट फोन असल्याने साॅफ्टवेअर अपडशेन, मोबाईल हँग होणे आदी कामे करण्यासाठीही अनेकजण येत असल्याचे समाेर आले.
जिल्ह्यात एक एप्रिलपासून लाॅकडाऊनला प्रारंभ करण्यात आला होता. केवळ जीवनावश्यक वस्तूंची खरेदी व विक्री करण्याचेच आदेश असल्याने इतर दुकाने बंद होती. १ जून रोजी ही दुकाने सुरू झाल्याने दोन महिन्यांत मोबाईलच्या असंख्य तक्रारी वाढत गेल्याने गर्दी वाढल्याचे सध्या दिसून येत आहे.
नंदुरबार शहरात मोबाईल दुरुस्तीसह खरेदी-विक्री, मोबाईल ॲक्सेसरीज, मोबाईलचे स्पेअर पार्टस यांचे होलसेल आणि रिटेल असे दोन्ही व्यवसाय आहेत. जिल्ह्यातील इतर शहरांना येथून माेबाईल आणि त्यांचे साहित्य पुरवठा केला जातो. दोन महिने बंद असलेल्या व्यवसायामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सर्वत्र एकाच वेळी दुकाने सुरू झाल्याने होलसेल दुकानांमध्येही गर्दी आहे.
दोन महिन्यांनी दुकान सुरू केले आहे. या काळात आर्थिक नुकसान झाले आहे. कोरोना उपाययोजना करून व्यवसाय सुरू केला आहे. नागरिकांनीही काळजी घेत दुकानात यावे, अशी व्यवस्था केली आहे. मास्क सक्तीचा आहे.
-संदीप गुरुबक्षाणी, मोबाईल शाॅपी मालक, नंदुरबार.
एक महिन्यापासून मोबाईल नादुरुस्त आहे. आवाज येत नसल्याने महत्त्वाचे काॅल्स हुकत होते. यातून नुकसानही झाले.
-नितीन पाडवी, नंदुरबार.
लाॅकडाऊन सुरू होण्यापूर्वी मोबाईल खराब होता. आणखी खराब होऊन हँग होत असल्याने येथे आलो आहे.
-प्रवीण पाटील, नंदुरबार.